पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार तसंच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची सभा आयोजित करण्यात आली. यावेळी बोलत असताना शरद पवार यांनी लाडकी बहीण योजनेवरुन महायुती सरकारवर निशाणा साधला.
काय म्हणाले शरद पवार? : राष्ट्रवादीचे अध्यक्ष (एसपी) शरद पवार म्हणाले की, "एकीकडं सरकारनं 'लाडकी बहीण योजना' आणली. पण गेल्या अडीच वर्षात या राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचं प्रमाण वाढलंय. राज्यातील 13 हजार महिला बेपत्ता आहेत. या अडीच वर्षात 64 महिलांच्या अत्याचाराच्या तक्रारी आल्या आहेत", अशी माहिती शरद पवार यांनी दिली. तसंच हे महायुती सरकार भ्रष्ट सरकार असल्याचा त्यांनी आरोप केला.
'मविआ'शिवाय पर्याय नाही : पुढं ते म्हणाले, "राज्यातील अनेक ठिकाणी माझे दौरे सुरू आहेत. पण प्रत्येक दौऱ्यात आम्ही लोकांना एकच सांगतोय की, महाराष्ट्राला एकसंघ ठेवायचं असेल तर महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही. आपण जर पाहिलं तर या सरकारनं 'लाडकी बहीण योजना' आणली. पण लाडकी बहीण नव्हे तर महिलांचं संरक्षण महत्त्वाचं आहे. आज महिला, शेतकरी आणि तरुण यांच्यात अस्वस्थता आहे." तसंच भाजपाचं सरकार असताना राज्य एक नंबरवरुन 18 व्या नंबरवर आलंय, असंही पवार यांनी सांगितलं.
मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले? : "पुणे देशाचं महत्त्वाचं शहर आहे. पुण्याचं योगदानदेखील खूप महत्त्वाचं आहे. आज देशात जे काही आपल्याला मिळालंय ते फक्त आणि फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळंच मिळालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आम्ही आंबेडकरांचा अपमान केला. पण आम्ही तर डॉ बाबसाहेब आंबेडकर यांची निवड केली. त्यानंतर त्यांच्या हस्ते संविधान लिहिलं गेलं. आम्ही तर आंबेडकरवादी आहोत", असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले. तसंच आम्ही कोणालाही बटू देत नाही. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी आपलं बलिदान दिलंय, अशी काँग्रेस अध्यक्षांनी महायुतीला भाषणातून आठवण करून दिली.
हेही वाचा -
- लाडक्या बहिणींना दम देणं धनंजय महाडिकांना पडलं महागात; निवडणूक आयोगानं उचललं 'हे' पाऊल
- मतांसाठी लाडक्या बहिणींना धमकी, राजकीय दबाव तंत्राचा वापर, संजय राऊतांचा महायुती सरकारवर हल्लाबोल
- लाडक्या बहिणींना धनंजय महाडिकांकडून सभेतच दम, माफी मागताना म्हणाले, "व्होट जिहाद.."