अमरावती : बडनेरा विधानसभा मतदारसंघात आमदार रवी राणा यांचा पराभव करण्यासाठी प्रीती बंड या सक्षम उमेदवार मानल्या जात होत्या. मात्र, असं असतानाच बुधवारी (23 ऑक्टोबर) शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं बडनेराच्या जागेसाठी पक्षाचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांचं नाव जाहीर केलं. त्यामुळं प्रीती बंड यांच्यासह त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला. "मला अगोदर कामाला लागा असं सांगितलं. यामुळं मी गत अनेक दिवसांपासून पदयात्रा आणि मतदारांच्या भेटी सुरू केल्या होत्या. मात्र, आता ऐनवेळी पक्षश्रेष्ठींनी जो काही निर्णय घेतलाय, त्यानंतर कोणाशी काय बोलावं हे सुचतच नाही", अशी प्रतिक्रिया प्रीती बंड यांनी दिलीय.
प्रीती बंड समर्थकांची गर्दी : शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं बुधवारी बडनेरा विधानसभा मतदार संघातून सुनील खराटे यांचं नाव जाहीर होताच, प्रीती बंड यांचे शेकडो समर्थक सायंकाळी त्यांच्या रुक्मिणी नगर परिसरातील निवासस्थानी पोहोचले. पक्षश्रेष्ठींवरील नाराजीमुळं बंड यांच्या घरी त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली. तसंच पक्षानं हा चुकीचा निर्णय घेतलाय. रवी राणा यांना पराभूत करण्यासाठी प्रीती बंड यांना सक्षम उमेदवार म्हणून पाहिलं जात होतं. मात्र, त्यांना उमेदवारी न देणं हा शिवसैनिकांवर अन्याय असून आमदार राणांच्या विरुद्ध आता डमी उमेदवार दिल्याचा आरोप प्रीती बंड यांच्या समर्थकांकडून केला जातोय.
प्रीती बंड झाल्या भावूक :"गत 40 वर्षांपासून बंड कुटुंबीय शिवसेनेसोबत (ठाकरे गट) एकनिष्ठ आहेत. आमच्याकडं पैसे नसल्यामुळं सर्व शिवसैनिकांनी आपण पैसे गोळा करू आणि माझ्यासाठी निवडणूक लढवू असं ठरवलं. त्या दिशेनं सगळे कामाला देखील लागले होते. मात्र, असं अचानक कसं काय झालं हे कळायला मार्गच नाही", असं म्हणत प्रीती बंड भावूक झाल्या. तसंच उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही प्रामाणिक आहोत. पण आता नेमकं काय करायचं हे या क्षणी सुचत नाहीये. याबाबत एक-दोन दिवसात शांततेनं विचार करू, असं देखील बंड म्हणाल्या.