पुणे :राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील नेते मंडळींच्या सभा ठिकठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखील राज्यात मोठ्या प्रमाणावर सभा होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षावर जोरदार टीका करत आहेत. मात्र, राज्याच्या राजकारणाचा केंद्र बिंदू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ते कुठेही टीका करताना पाहायला मिळत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शरद पवार यांच्यावर कोणतीही टीका न केल्यामुळं यासंदर्भातील राजकीय चर्चेला जोरदार सुरवात झाली आहे.
पंतप्रधान मोदी पवारांच्या बाबत शांत का? :काही वर्षांपूर्वी बारामतीत येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत ज्यांचं बोट धरून मी राजकारणात आलो, असं म्हणणारे देशाचे पंतप्रधान जेव्हा जेव्हा राज्यात येतात, तेव्हा तेव्हा ते शरद पवार यांच्यावर टीका करताना नेहमीच पाहायला मिळालं. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी 'भटकती आत्मा', असं म्हणत पी एम मोदींनी शरद पवारांवर टीका केली होती. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत सामील झाल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवारांवर टीका करत असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत एकीकडे शरद पवार महायुती तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात अनेक ठिकाणी सभा घेत असताना कुठंही शरद पवारांवर टीका केल्याचं पाहायला मिळालं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पवारांच्या बाबतीत टीका न करण्याच्या घेतलेल्या भूमिकेनं राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभेत बसला होता फटका : लोकसभा निवडणुकीच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात बोलताना शरद पवारांवर 'भटकती आत्मा' असा, उल्लेख करत टीका केली. यानंतर राज्यभर शरद पवारांच्या बाजूनं सहानभुती पाहायला मिळाली आणि 10 जागांपैकी 8 जागांवर पवारांचे उमेदवार विजयी झाले. तसंच महायुतीत असलेले अजित पवार यांना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेचा फटका बसला. आत्ता मात्र विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शरद पवार यांच्यावर कोणतीही टीका होत नसल्यानं अनेक चर्चा सध्या होताना पाहायला मिळत आहेत.
दुसरीकडे पवार विरुद्ध पवार :राष्ट्रवादी फुटीनंतर सातत्यानं अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षाकडून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळाली. यानंतर आता विधानसभेत देखील बारामतीत काका विरुद्ध पुतणे अशी लढत पाहायला मिळतेय. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवारांबाबत एकही शब्द बोलताना दिसून येत नाही. तर दुसरीकडे अजित पवार तसंच त्यांच्या सहकाऱ्यांकडून प्रत्यक्ष तसंच अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्यावर टीका केली जात आहे. मध्यंतरी सांगली येथे झालेल्या सभेत सिंचन घोटाळ्याचा उल्लेख करत अजित पवार यांनी दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं. दरम्यान आत्ता भाजपा आणि राष्ट्रवादी पक्षात बोलणी करण्यासाठी शरद पवार, अमित शाह, गौतम अदानी आणि प्रफुल पटेल यांच्यात 5 वर्षापूर्वी बैठक पार पडली होती, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे. त्यामुळं या विधानसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार अशी लढत आणि टीका होताना पाहायला मिळत आहे.
... म्हणून मोदी पवारांवर टीका करत नाहीत :याबाबत राजकीय अभ्यासक ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर बिजले म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात ठिकठिकाणी होत असलेल्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर किंवा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत नसल्याचं दिसून येतं. लोकसभा निवडणूक प्रचारात या दोघांवर टीका केल्यानं त्यांच्याविषयी मतदारांत सहानुभूती वाढली. त्याचा फटका भाजपाला बसला. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा लढत असलेल्या निम्म्यापेक्षा अधिक जागांवर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार आहेत, त्यामुळं मोदींनी काँग्रेस विरोधात टीका करण्यावर भर दिला आहे. विदर्भामध्ये 62 पैकी 36 जागांवर काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी लढाई आहे. तर राज्यात हे दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध 76 जागांवर लढत आहेत. त्यामुळं मोदींनी प्रचारामध्ये काँग्रेसलाच लक्ष्य केल्याचं दिसून येतं. तसंच विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि शरद पवार एकत्र येण्याच्या होत असलेल्या चर्चा राजकीय असून त्यामध्ये फारसं काही तथ्य नाही."
हेही वाचा
- "ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी"; विखेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवार यांची फटकेबाजी
- "इंदिरा गांधी परत आल्या तरी....," कलम ३७० वरुन अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
- विधानसभेच्या प्रचारात नेत्यांची बेताल वक्तव्ये; किनवट आणि मुखेडच्या उमेदवारांची जीभ घसरली