ठाणे : मुख्यमंत्र्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून आपल्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात रात्री 10 नंतरही प्रचार केला. निवडणुक आयोग आता करवाई करणार का? असा थेट सवाल शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार केदार दिघे यांनी केला आहे. दरम्यान, निवडणुक आयोग प्रचंड दबावाखाली असून विरोधकांना एक न्याय आणि मुख्यमंत्र्यांना एक न्याय कसा? असा सवाल केदार दिघे यांनी केला आहे.
केदार दिघे संतापले : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात रविवारी (11 नोव्हेंबर) रॅली काढली. वागळे इस्टेट येथील राम नगर आयटीआय सर्कल येथून दुपारी 3 वाजता रॅलीची सुरुवात होणारी होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रॅलीच्या ठिकाणी पोहोचायला उशिर झाला. रात्री उशिरा ही रॅली कोपरी येथे पोहचली. मुळात रात्री 10 नंतर प्रचार करण्यास परवानगी नसताना देखील मुख्यमंत्र्यांना प्रचाराची वेळ संपली असल्याचा पत्ताच लागला नाही. रात्री 10:30 वाजले तरी आपल्या लवाजम्यासह प्रचार रॅली काढत फटाक्याची जोरदार आतषबाजी सुरू होती. हा सर्व प्रकार निवडणूक आयोगाच्या समोरच सुरू होता. रॅलीवेळी आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडील कॅमेरे बंद दिसून आल्यानं केदार दिघे यांनी संताप व्यक्त केला.