महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

लाडक्या बहिणींना दम देणं धनंजय महाडिकांना पडलं महागात; निवडणूक आयोगानं उचललं 'हे' पाऊल - DHANAJAY MAHADIK ECI NOTICE

सरकारच्या 'लाडकी बहीण योजने'वरून सध्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजपा खासदार धनंजय महाडिक यांनी जाहीर सभेत या योजनेसंदर्भात महिलांबाबत वादग्रस्त विधान केलं होतं.

DHANAJAY MAHADIK ECI NOTICE
धनंजय महाडिक महिलांबाबत वादग्रस्त विधान प्रकरण (Source - ETV Bharat)

By PTI

Published : Nov 10, 2024, 8:59 PM IST

Updated : Nov 10, 2024, 10:05 PM IST

कोल्हापूर : भाजपा खासदार धनंजय महाडिक यांना जाहीर सभेत वादग्रस्त विधान करणं महागात पडलं. सभेत बोलताना त्यांनी 'लाडकी बहीण योजने'संदर्भात महिलांबाबत वादग्रस्त विधान केलं होतं, असा आरोप विरोधकांनी केला. यानंतर विरोधकांनी धनंजय महाडिक यांच्यावर टीका करत कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणात आता निवडणूक आयोगानं धनंजय महाडिक यांना नोटीस धाडली आहे.

निवडणूक आयोगाची नोटीस : धनंजय महाडिक यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी निवडणूक आयोगानं भारतीय न्यायसंहिता कलम 179 अंतर्गत आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्यानं नोटीस बजावली आहे.

धनंजय महाडिक नेमकं काय म्हणाले होते? : "लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत किंवा सभेत दिसल्या, तर त्यांचे फोटो काढा. ते फोटो आम्हाला पाठवा, म्हणजे आम्ही त्यांची व्यवस्था करू," असं विधान खासदार धनंजय महाडिक यांनी केलं होतं. त्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.

आम्ही खपवून घेणार नाही : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी धनंजय महाडिक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. "भाजपाचे नेते खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबाबत केलेले वक्तव्य अतिशय संतापजनक आहे. महिलांना दमदाटी करण्याचा प्रकार हा भाजपाचा लोकशाही व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे, हे सिद्ध करण्यास पुरेसा आहे. भाजपा नेत्याचे हे विधान लोकशाही आणि संविधानाच्या विरोधातील आहे. कोणत्या पक्षाच्या रॅलीत नागरिकांनी सहभागी व्हायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. यासाठी कुणीही कुणावर दबाव टाकू शकत नाही. महिला आयोगानं त्यांच्यावर गंभीर कारवाई करावी," अशी मागणी त्यांनी केली.

मी बिनशर्त माफी मागतो : "माझ्या वक्तव्यानं कुठल्याही माता भगिनीचं मन दुखावलं असेल तर त्यांची मी बिनशर्त माफी मागतो. माझं हे वक्तव्य कुठल्याही माता भगिनीचा अपमान करण्यासाठी मुळीच नव्हतं. 'लाडकी बहीण योजना' ही राज्यातील एक लोकप्रिय योजना आहे आणि ती निवडणुकीत गेम चेंजर ठरेल. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला," असं स्पष्टीकरण धनंजय महाडिक यांनी त्यांच्या वक्तव्यावर दिलं.

हेही वाचा

  1. "घड्याळ नको, कमळ आणा"; अमित शाहांचा चक्क राष्ट्रवादीविरोधात प्रचार, पाच मिनिटांत उरकलं भाषण
  2. राजेंद्र गावित यांनी जाहिर केलं संकल्प पत्रक; रोजगार,शिक्षण,आरोग्य,पाणी आदींवर दिला भर
  3. "...तिथं मशाल आलीच पाहिजे"; उद्धव ठाकरेंच्या विधानानं महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं?
Last Updated : Nov 10, 2024, 10:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details