महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

"आम्ही सख्खे भाऊ, महाविकास आघाडीत बहिणींचे सावत्र भाऊ", फडणवीसांचा विरोधकांना टोला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बडनेरा विधानसभा मतदारसंघात अमरावती शहरातील गोपाल नगर परिसरात आयोजित जाहीर सभेला संबोधित केलं.

MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
देवेंद्र फडणवीस (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 8, 2024, 11:01 PM IST

अमरावती :लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्ही राज्यातील आमच्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपये देत आहोत. निवडणुकीनंतर डिसेंबर महिन्यापासून आम्ही आमच्या बहिणींना 2100 रुपये देऊ. भावाची बहिणींना मदत मिळत असताना आमच्या विरोधकांनी न्यायालयात धाव घेऊन या योजना बंद कराव्या, अशी याचिका दाखल केली. खरंतर बहिणीचं हित जोपासणारे आम्ही महायुतीचे सारे सख्खे भाऊ आहोत आणि महाविकास आघाडीत बहिणींचे सावत्र भाऊ आहेत. यामुळं बहिणींनी सख्ख्या भावांवर विश्वास ठेवण्याचं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बडनेरा विधानसभा मतदारसंघात अमरावती शहरातील गोपाल नगर परिसरात आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना केलं.

विरोधकांची बोंब :देवेंद्र फडणवीस म्हणाले, "राज्यातील आमच्या बहिणी आणि असंख्य युवकांच्या हिताचे निर्णय आमचं सरकार घेत असताना या योजनांच्या विरोधात विरोधकांनी गदारोळ केला. सुरुवातीला लाडकी बहीण योजना शक्यच नाही, असं विरोधकांचं म्हणणं होतं. आता या योजनेसाठी व्यर्थ पैसा जातोय, अशी बोंब विरोधक करत आहेत."

प्रचार सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Source - ETV Bharat Reporter)

शेतकऱ्यांसाठी वेगळी वीज कंपनी : "शेतकऱ्यांना शेतपंपासाठी वीज फुकट देण्याचा निर्णय आपल्या सरकारनं घेतला आणि आता तर दिवसा बारा तास वीज देण्याचा निर्णय आपण घेणार आहोत. शेतकऱ्यांसाठी वेगळी वीज कंपनी तयार केली जात असून या ठिकाणी 14 हजार मेगा वॅट वीज निर्मिती होणार असून 18 महिन्यात या वीज कंपनीचं काम पूर्ण होईल, त्यानंतर माझ्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज मिळेल," असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

भाजपा रवी राणांच्या पाठीशी : "बडनेरा विधानसभा मतदारसंघात रवी राणा यांचा विजय निश्चित आहे. यावेळी ते रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी व्हावेत, याकरिता मी आज आलो. संपूर्ण भाजपा ही रवी राणा यांच्या पाठीशी असून बडनेरा विधानसभा मतदारसंघात रवी राणा आणि अमरावती विधानसभा मतदारसंघात सुलभा खोडके हे दोन्ही महायुतीचे उमेदवार निश्चितच विजयी होतील. त्यांना आपण साऱ्यांनी साथ द्यावी," असं आवाहन देखील देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित जनतेला केलं.

हेही वाचा

  1. "एकनाथ शिंदे एकदा नाही, तर शंभर वेळा जेलमध्ये जायला तयार", मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ठणकावलं
  2. राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकानं खळबळ; अनिल देशमुख म्हणाले, "छगन भुजबळांबद्दल लिहिलंय ते 100 टक्के..."
  3. निवडणूक आयोगाला माहिती न देणाऱ्या शाळांवर कारवाई, अब्दुल सत्तार यांच्याशी संबंधित सर्वाधिक शाळा

ABOUT THE AUTHOR

...view details