छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यातील नऊ मतदारसंघात महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झालं आहे. त्यानुसार ठाकरे गटाला 6 काँग्रेसला 2 तर राष्ट्रवादीला 1 जागा मिळणार आहे. त्यापैकी ठाकरे गटानं आपल्या 5 मतदार संघातील उमेदवारांची संभाव्य यादी जाहीर केली. त्यांनतर पक्षातील एक गट नाराज झाला आहे. उमेदवारी दिलेल्या नावांमध्ये 3 जण हे भाजपामधून पक्षात आलेले आहेत. त्यामुळं पैसे घेऊन उमेदवारी जाहीर करून निष्ठावंतांना डावललं, असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी केलाय. तर विजयी होण्याची शाश्वती असणाऱ्या उमेदवारांना संधी दिल्याचं ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी सांगितलं.
ठाकरे गटातील एक गट नाराज? : निवडणुका आल्या की अनेक पक्षातील इच्छुक उमेदवार उमेदवारी मिळेल, यासाठी पक्षांतर करतात. याचाच प्रत्यय 2024 चा विधानसभा निवडणुकीत देखील आला. मात्र, असं करत असताना त्या त्या पक्षातील जुने निष्ठावंत मात्र नाराज होतात, हे काही आता नवीन राहिलं नाही. याचाच प्रत्यय आता ठाकरे गटात आल्याचं पाहायला मिळालं. शुक्रवारी संभाजीनगर जिल्ह्यातील ठाकरे गट लढत असलेल्या सहापैकी पाच मतदार संघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये औरंगाबाद मध्ये किशनचंद तनवाणी, पश्चिम राजू शिंदे, सिल्लोड सुरेश बनकर, वैजापूर दिनेश परदेशी आणि कन्नड उदयसिंह राजपूत या नावांची घोषणा करण्यात आली. यातील तीन उमेदवार भाजपामधून ठाकरे गटात आलेले आहेत. त्यामुळं इच्छुक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली.
ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आलेले उमेदवार खालीलप्रमाणे.
सिल्लोड : सिल्लोड मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा मानला जातो. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांचा हा मतदार संघ. गेल्या पंधरा वर्षापासून अब्दुल सत्तार यांनी एक हाती सत्ता मिळवण्यात यश मिळवलंय. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे सध्याचे उमेदवार सुरेश बनकर यांनी भाजपातर्फे दोनदा निवडणूक लढवली आहे. भाजपाचा आश्वासक चेहरा सुरेश बनकर यांच्या माध्यमातून निर्माण झाला होता. मात्र भाजपाकडून त्या मतदारसंघात उमेदवार उभा केला जाणार नसल्यानं ठाकरे गटानं त्याचा फायदा घेत सुरेश बनकर यांना ठाकरे गटानं पक्षात घेऊन उमेदवारी दिली.
वैजापूर :वैजापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जायचा. आरंभवाणी यांनी याआधी वैजापूरमध्ये वर्चस्व निर्माण केलं होतं. मात्र, 2014 मध्ये ही जागा राष्ट्रवादीनं मिळवली. त्यानंतर 2019 मध्ये हा गड राखण्यात शिवसेनेला पुन्हा एकदा यश मिळालं, मात्र तेथील शिवसेनेचे विजयी उमेदवार रमेश बोरणारे हे शिंदे गटात गेल्यामुळं त्या ठिकाणी पुन्हा आपलं वर्चस्व निर्माण करण्याचं आव्हान ठाकरे गटाकडे आहे. ठाकरे गटानं भाजपाचे स्थानिक नेते दिनेश परदेशी यांना आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी जाहीर केलीय.
औरंगाबाद पश्चिम : औरंगाबाद पश्चिम हा मतदार संघ निर्माण झाल्यापासून त्या ठिकाणी शिवसेनेनं एक हाती विजय मिळवला होता. आमदार संजय शिरसाट यांनी चार वेळा निवडणूक जिंकत आपला दबदबा कायम ठेवला. मात्र, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर संजय शिरसाट हे त्या गटाचे प्रवक्ते म्हणून समोर आले. त्यामुळं हा गड जिंकण्यासाठी ठाकरे गटानं भाजपाचे पश्चिम मतदार संघातून भाजपतर्फे इच्छुक असलेले उमेदवार राजू शिंदे यांना आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी दिली. 2019 मध्ये राजू शिंदे यांनी भाजपामध्ये असताना देखील अपक्ष म्हणून संजय शिरसाट यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.
औरंगाबाद मध्य :औरंगाबाद मध्य मतदारसंघातून ठाकरे गटाकडे तर्फे जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. तनवाणी हे मूळ शिवसेनेचे मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाकडून उमेदवारी मिळवली होती, त्यात त्यांचा पराभव झाला होता. मात्र त्यानंतर भाजपाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी सहा वर्षे काम केलं. नंतर ते पुन्हा शिवसेनेत दाखल झाले. त्यानंतर त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी व्यक्त केली होती. मात्र, असं असतानाही तनवाणी यांना उमेदवारी देण्यात आली.
पैसे घेऊन उमेदवारी? :शुक्रवारी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शनिवारी शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर आरोप केलाय. जे उमेदवार देण्यात आले ते दुसऱ्या पक्षातून इच्छुक आहेत, त्या पक्षातून त्यांना उमेदवारी मिळणार नसल्यानं ठाकरे गटाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली. पैसे घेऊन यांना तिकीट देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. संजय शिरसाट यांच्या प्रतिक्रियेनंतर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी काहीतरी बोलावं लागतं, म्हणून त्यांनी आरोप केला असेल. पैसे दिले किंवा घेतले याचा ठोस पुरावा आहे का? तरच बोलावं. दिलेली उमेदवारी ही त्यांची योग्यता बघूनच देण्यात आल्याचं तनवाणी यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा
- "कार्यकर्त्यांवर दहशत केली तर गाडून टाकू..." सुजय विखेंचा बाळासाहेब थोरात यांना इशारा
- कोल्हापूर जिल्ह्यात 8 विधानसभा मतदारसंघात घराणेशाहीचा सिलसिला कायम, वारसदारांसाठी नेते आग्रही
- शरद पवारांकडं अनेकांची घरवापसी, ठाकरेंची दारं अद्याप बंदच; हे ठाकरेंचं यश की अपयश?