अकोला : विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून संधी मिळण्याची आशा संपुष्टात आल्यानंतर पक्षाशी बंडखोरी केलेल्या दोन उमेदवारांना शांत करण्याचे पक्षश्रेष्ठींचे प्रयत्न फोल ठरल्याचं दिसत आहे. एक बंडखोर उमेदवार प्रहार जनशक्ती पक्षातून तर दुसरा उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीत उभा आहे. तरीही पक्षाकडून या दोघांची मनधरणी सुरू असल्याचं बोललं जात आहे.
भाजपा गड राखणार की बदल घडणार? : भाजपानं तिकीट नाकारल्यानं अशोक ओळंबे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. जुने शहर परिसरात विशेषतः डाबकी रोड परिसरात त्यांची चांगली पकड आहे. तर दुसरीकडे सिंधी समाजाचे नेते हरिष आलिमचंदानी यांनाही पक्षानं उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. पक्षाशी बंडखोरी करणं हा पर्याय असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं आता त्यांचं आवाहन थेट भाजपाचे उमेदवार विजय अग्रवाल यांनाच असल्यानं भाजपाला आता अकोला पश्चिम गड राखता येतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
नगरसेवकांमध्येही नाराजी :महानगरपालिकेमध्ये महापौर असताना आणि शहर अध्यक्ष असताना विजय अग्रवाल यांनी पक्षातील नगरसेवकांना विश्वासात घेतलं नाही. त्यांच्या हेकेखोरपणामुळं नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी होती. पक्षानं विजय अग्रवाल यांना उमेदवारी देऊ नये, असं मत असतानाही पक्षानं त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळं त्यांच्याविरोधात नगरसेवकांमध्ये नाराजी आहे.