मुंबई : विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस उरल्यानं राजकीय घडामोडींना वेग आलाय. शेवटच्या टप्प्यात उमेदवारी आपल्या गळ्यात पाडून घेण्यासाठी इच्छुकांनी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. नाराज उमेदवार आपली नाराजी दर्शवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची भेट घेत आहेत. माहिम मतदारसंघातून मनसेचे उमेदवार राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यावरुन सुरु असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर विद्यमान आमदार व एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी रविवारी (27 ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
रात्री उशिरापर्यंत निर्णय होण्याची शक्यता : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळं त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांना विधानभवनात पाठवण्यासाठी आपल्याला मदत करण्याची गरज आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सरवणकरांना सांगितल्याची माहिती मिळत आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे.
रामदास आठवले देखील नाराज :दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारमधील राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व जागावाटपावर चर्चा केली. रिपब्लिकन पक्ष राज्यातील प्रमुख पक्ष असून एनडीएचा सर्वात जुना मित्र पक्ष असल्याची आठवलेंनी आठवण करुन दिली. महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्षाला डावललं जात असल्यानं आठवले यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. महायुतीनं जागावाटपाच्या चर्चेत देखील सहभागी करुन घेतले नसल्यानं कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमात उपस्थित राहायला कार्यकर्त्यांनी नकार दिलाय. 2012 पासून महायुतीमध्ये आपला पक्ष असताना जागा मिळत नसल्यानं आठवले यांनी नाराजी व्यक्त केलीय.
चार ते पाच जागांवर उमेदवारीची मागणी :रिपब्लिकन पक्षानं चार ते पाच जागांवर उमेदवारी मागितली होती. मात्र एकही जागा मिळालेली नाही, पक्षाला विधानपरिषदेवर देखील प्रतिनिधित्व हवं असल्याची मागणी आठवलेंनी यावेळी फडणवीस यांच्याकडे केली. मुंबईतील धारावी, चेंबूरच्या जागेसाठी पक्षाचा आग्रह आहे. आतापर्यंत भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत हमखास असणारे रामदास आठवले हे नाव यावेळी मात्र यादीत दिसत नसल्यानं रिपब्लिकन पक्षात चर्चेला तोंड फुटलंय.
हेही वाचा
- "आमच्यापैकी कुणाचीही बायको हिरोईन नाही म्हणून..."; फहाद अहमदच्या उमेदवारीवरुन राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाराज
- अर्ध्या तासात गुंड जमा, सुजय विखेंवरील प्राणघातक हल्लाचा मास्टमाईंड कोण? राधाकृष्ण विखे पाटलांचा सवाल
- पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांनी उपसलं बंडाचं हत्यार; विक्रमगडमधून निवडणूक लढवण्याचा निर्धार