नंदुरबार : जिल्ह्यातल्या अर्ज माघारीनंतर लढतीचं चित्र स्पष्ट झालंय. सर्वात कमी उमेदवार हे शहादा मतदारसंघात असणार असून सर्वाधिक उमेदवार हे नवापूर मतदारसंघात असणार आहेत. जिल्ह्यात चार विधानसभा क्षेत्रात 31 उमेदवार रिंगणात असणार असून 32 उमेदवारांनी माघार घेतली आहे. शहाद्यात तीन उमेदवार शिल्लक राहीले असून नवापूरात 12 उमेदवार रिंगणात असणार आहेत.
कोणी घेतला उमेदवारी अर्ज माघारी : काँग्रेस पक्षाच्यावतीनं शहादा आणि नंदुरबार विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करण्यात आली होती. शहादा मतदारसंघातून विद्यमान जि.प. उपाध्यक्ष सुहास नाईक आणि नंदुरबारमधून तालुकाध्यक्ष विश्वनाथ वळवी यांनी बंडखोरी केली होती. त्यांची समजूत काढून त्यांना पक्षाचे काम करण्याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांची मनधरणी केली. तर शिंदे पक्षातर्फे अक्कलकुवा मतदारसंघात विजय पराडके यांनी आपला अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला होता. तो माघार घेण्यासाठी संपर्कप्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांची मन धरणी केली. त्यानंतर त्यांनी देखील अर्ज माघारी घेतली. मात्र भाजपा तर्फे माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी बंडखोरी करत अक्कलकुवा मतदारसंघात आपला अपक्ष उमेदवार अर्ज माघार न घेता निवडणूक लढविण्याबाबत स्पष्ट केलं आहे.
जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचे चित्र: नंदुरबार जिल्ह्यात अर्ज माघारीनंतर आता सर्व लढतीचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा मतदारसंघात 33 इच्छुकांनी नामांकण अर्ज दाखल केले होते. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात एकूण 17 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 10 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 7 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. शहादा विधानसभा मतदारसंघात एकूण 21 नामांकण दाखल झाले होते. त्यापैकी 12 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. आज तब्बल 9 उमेदवारांनी अर्ज माघारा घेतला असून आता 3 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. नंदुरबार विधानसभा क्षेत्रात 27 इच्छुकांनी नामांकण दाखल केले होते. छाणणी अंती विधानसभा 13 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी चौघांनी अर्ज माघारी घेतला असून आता 9 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. तर सर्वाधिक उमेदवार हे नवापूर मतदारसंघात असणार आहे. याठिकाणी 38 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विधानसभा मतदारसंघात एकूण 21 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 9 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 12 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहे.
बंडखोरांच्या मन धरणी: जिल्ह्यात काँग्रेस पक्षात दोन मतदारसंघात बंडखोरी करण्यात आली होती. काँग्रेस पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या बंडखोरीला रोखण्यासाठी पक्ष श्रेष्ठींकडून प्रयत्न करण्यात येत होते. आज सुहास नाईक यांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर लगेचच सुहास नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेण्याची घोषणा केली. त्यामुळं काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र गावित यांना मोठा फायदा होणार आहे. तर नंदुरबार विधानसभा मतदारसंघात तालुकाध्यक्ष विश्वनाथ वळवी यांची देखील मनधरणी करण्यात त्यांना यश आलं. त्यांनी देखील नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज माघार घेतला. त्यामुळं काँग्रेसमधील बंडखोरी रोखण्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना यश आलं आहे.