अहमदनगर Rahul Gandhi To Visit Gujarat :काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. आपल्या दौऱ्यात ते पोलीस कोठडीत असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. याशिवाय राहुल गांधी राजकोटमध्ये नुकतीच लागलेली आग आणि मोरबी येथील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेतील पीडितांशी संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे आज गृहमंत्री अमित शाह हे सुद्धा आज गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत.
विरोधी पक्षनेते झाल्यानंतर राहुल गांधींची पहिलाच गुजरात दौरा :विरोधी पक्षनेते झाल्यानंतर राहुल गांधी यांचा हा पहिलाच गुजरात दौरा आहे. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी यावेळी गुजरातमध्ये भाजपाचा पराभव करणार असल्याचं सांगितलं होतं. 2027 मध्ये 'इंडिया' आघाडी भाजपचाा पराभव करेल, असं राहुल गांधी म्हणाले. या विधानानंतर राहुल गांधी यांचा गुजरात दौरा होत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी आतापासूनच 2027 ची तयारी सुरू केल्याची चर्चा करण्यात येत आहे. दुपारी 1 वाजता राहुल गांधी अहमदाबादमधील वसना पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कोठडीत असलेल्या काँग्रेस नेत्यांची भेट घेतील. दुपारी 1:30 वाजता ते अहमदाबादच्या काँग्रेस भवनातील पीसीसी कार्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करतील. त्यानंतर दुपारी 2:30 वाजता राजकोटमध्ये नुकतीच लागलेली आग आणि मोरबी येथील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेतील पीडितांशी संवाद साधणार आहेत.
राहुल गांधी यांच्या विधानावरुन गदारोळ :राहुल गांधी यांच्या 'भाजपा म्हणजे सगळे हिंदू नाही' या वक्तव्यावरुन गदारोळ सुरू आहे. भाजपा आणि आरएसएसचे लोक म्हणजे हिंदू नाहीत, असं राहुल गांधी यांनी लोकसभेत म्हटलं होतं. यानंतर त्यांनी दिलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ गुजरातमधील भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं केली. गुजरातमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी दगडफेक आणि काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला केला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या पुतळ्याचं दहन केलं. राहुल गांधी यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया एक्सवर लिहिलं होतं की, "हिंसा आणि द्वेष पसरवणाऱ्या भाजपाच्या लोकांना हिंदू धर्माची मूलभूत तत्त्वेच समजत नाहीत. गुजरातची जनता भाजपाला धडा शिकवेल. मी पुन्हा सांगतोय – गुजरातमध्ये 'इंडिया' आघाडी जिंकणार आहे!"