पुणे NCP candidate list : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (अजित पवार गट) महत्त्वाची बैठक आज (26 मार्च) पुण्यात पार पडली. बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) आपला पहिला उमेदवार जाहीर केला. रायगड लोकसभा मतदारसंघातून (Raigad Loksabha) पुन्हा एकदा सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना उमदेवारी देण्यात आली असून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर दुसरा उमेदवार जाहीर करण्यात येणार असल्याचंही यावेळी अजित पवार यांनी सांगितलं.
नेमकं काय म्हणाले अजित पवार? : यावेळी बोलत असताना अजित पवार म्हणाले की, "महायुतीच्या जागावाटपाचं 99 टक्के काम पूर्ण झालं असून 28 तारखेला यादी जाहीर करण्यात येईल. शिवाजीराव आढळराव पाटील 20 वर्षांपूर्वी आमच्या पक्षातून शिवसेनेत गेले होते. त्यांचा आज पक्षप्रवेश झाल्यानंतर शिरुरची उमेदवारी जाहीर करण्यात येईल. तसंच अमोल कोल्हे आणि धनंजय मुंडे यांना देखील मीच तिकीट दिलं होतं," असंही त्यांनी सांगितलं. तसंच काही कारण नसताना राष्ट्रवादीला तीन किंवा चारच जागा लढविण्यास मिळणार अशी खोटी माहिती पसरवली जात होती. प्रत्येक मंत्र्यावर एका लोकसभा मतदारसंघाची तर प्रत्येक आमदारावर एका विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी असेल, अशी माहिती त्यांनी दिली.