ठाणे Lok Sabha Elections 2024 : एकीकडे लोकसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरु असतानाच राजकीय समीकरणे रोजच बदलत आहेत. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत अद्यापही भिवंडी लोकसभेच्या उमेदवाराबाबत संभ्रमात आहे. अशातच मनसेचा तिढा कायम असल्यानं महाविकास आघाडी राजकीय पेचात सापडली आहे. आघाडीची डोकेदुखी वाढली असतानाच राज ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी दिल्लीत जाऊन भेट घेतली. मात्र या दोघांमध्ये झालेली संपूर्ण चर्चाही गुलदस्त्यातच आहे. दिल्ली भेटीनंतर नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्यातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीवरही आतापर्यंत तरी प्रश्नचिन्हच दिसून येत आहे.
मागील दोन लोकसभेत लाखाच्याजवळ मतं : मागील लोकसभा निवडणुक 2009 मध्ये भिवंडी मनसेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष डी. के. म्हात्रे यांनी काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांच्या विरोधात निवडणूक लढवताना 1 लाखांहून अधिक मते मिळवली होती. तर 2014 मध्ये मनसेमध्ये असताना सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या विरोधात 96 हजार मतं मिळवली होती. त्यामुळं मनसेची भिवंडी लोकसभा क्षेत्रातील ताकद पाहता मनसे आघाडीत की महायुतीत सामील होते का? याबाबत मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमावस्था असल्याचं स्पष्टपणे उघड होतंय.
कार्यकर्ते संभ्रमात : मनसेचा राजकीय इतिहास पाहता मनसेच्या पक्ष स्थापनेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांत मनसेचे राज्यात 13 आमदार विजयी झाले होते. यात भिवंडी लोकसभा मतदार संघात 2009 च्या निवडणुकीत प्रकाश भोईर हे कल्याण पश्चिममधून आमदार म्हणून निवडून आले होते. यासह शहापूर, कल्याण, भिवंडी शहरासह ग्रामीणमध्ये मनसेनं बऱ्यापैकी हातपाय पसरवले होते. तर भिवंडी, शहापूर, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि ग्रामपंचायतींमध्येदेखील मनसेचे सदस्य होते. परंतु, महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येवून कोणता नेता कुठल्या पक्षाची वाट धरेल या भीतीनं कार्यकर्ते आणि पदाधिकारी चिंतेत आहेत. त्यामुळं आगामी लोकसभा निवडणूकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोणत्या पक्षाची वाट धरतील हे पाहणं महत्त्वाचं आहे.