नंदुरबार Lok Sabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस पक्षातर्फे सात उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यात नंदुरबारच्या उमेदवाराचादेखील समावेश आहे. कॉंग्रेसनं नंदुरबार मतदारसंघातून माजी मंत्री तथा विद्यमान आमदार ॲड के. सी. पाडवी यांचे पुत्र ॲड गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिल्यानं जिल्ह्यात रंगतदार निवडणूक होणार आहे. नवखा चेहरा आणि नवा उमेदवार मिळाल्यानं काँग्रेस पक्षाकडून त्यांचं स्वागत केलं जातंय. यामुळं जिल्ह्यात डॉक्टर विरुद्ध वकील अशी लढत रंगणार आहे.
डॉक्टर विरुद्ध वकील लढत रंगणार : ॲड. गोवाल पाडवी यांना उमेदवारी मिळाल्यानंतर काँग्रेस पक्षाकडून नवख्या उमेदवाराचं जोरदार स्वागत केलं जातंय. तर भाजपाकडून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळणाऱ्या खासदार डॉ. हिना गावित यांना ते कशी टक्कर देतात, याबाबत जिल्ह्यात उत्सुकता आहे. ॲड गोवाल पाडवी हे गेल्या काही वर्षापासून सातपुड्यात सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. त्यांचे वडील के सी पाडवी यांनी अक्कलकुवा मतदार संघातून सात वेळा आमदारकी भूषविलीय. ते विद्यमान आमदार असून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आदिवासी विकास मंत्री म्हणूनही त्यांनी अडीच वर्ष काम पाहिलंय. वडिलांचा राजकीय वारसा चालविण्यासाठी ॲड गोवाल पाडवी हे सक्रिय झाले आहेत. यामुळं या लोकसभा मतदारसंघात डॉक्टर विरुद्ध वकील अशी लढत रंगणार आहे.
वडिलांऐवजी मुलाला संधी : गेल्या लोकसभा निवडणुकीत के सी पाडवी यांनी काँग्रेसतर्फे लोकसभा निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांना नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून 42 टक्के मतदान मिळालं होतं. तर भाजपा उमेदवार डॉ. हिना गावित यांना 49 टक्के मतदान मिळाल्यानं त्या विजयी झाल्या होत्या. यंदादेखील लोकसभा उमेदवारीसाठी के सी पाडवी यांच्या नावाची चर्चा होती. मात्र अचानक त्यांचे चिरंजीव ॲड गोवाल पाडवी यांचं नाव समोर आल्यानं जिल्ह्यात चर्चांना उधाण आलंय.
महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांचा महायुतीत प्रवेश : नंदुरबारचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते ॲड पद्माकर वळवी यांनी भाजपात प्रवेश केल्यानं जिल्ह्यात काँग्रेसला मोठी हानी झालीय. शहादा तळोदा मतदार संघातून ते आमदार म्हणून निवडून आले होते. तसंच त्यांनी मंत्रीपदही भूषविली आहेत. त्यांचं शहादा व तळोदा विधानसभा क्षेत्रात चांगलं वर्चस्व आहे. त्यांच्या भाजपा प्रवेशामुळं काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबार जिल्ह्यात दाखल झाली होती. त्याच दिवशी त्यांनी मुंबई इथं भाजपात प्रवेश केला होता. तर महाविकास आघाडीतील शिवसेनेचे (ठाकरे गट) विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी यांनीही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानं महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय.
हेही वाचा :
- महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर; शाहू महाराज, रवींद्र धंगेकर, प्रणिती शिंदे रिंगणात - Congress Candidate List