मुंबई Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी देशभरात जाहीर होणार असून महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. राज्यात मागील दोन वर्षात बदललेली राजकीय समीकरणं पाहता यंदा महाविकास आघाडी की महायुती कोणाच्या बाजूनं जनतेनं कौल दिला ते स्पष्ट होणार आहे. अशात उद्धव ठाकरे, शरद पवार यांना मिळालेल्या सहानुभूतीच्या लाटेनं राज्यात कुठल्या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच पारडं जड मानलं जातंय याचा घेतलेला एक धावता आढावा.
पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांची ताकद : पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 12 जागा आहेत. यात कोल्हापुरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या विजयासाठी महाविकास आघाडीनं पूर्ण ताकद पणाला लावली होती. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांचा पराभव इथं निश्चित मानला जातोय. तर सोलापुरमध्ये काँग्रेसच्याच प्रणिती शिंदे या भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांचा पराभव करतील असा अंदाज आहे. पुण्यामध्ये काँग्रेसचे रवींद्र धनगर हे भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांचा पराभव करतील अशीही दाट शक्यता असल्यानं पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस 3 जागा जिंकेल असा अनुमान आहे. तर बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे या त्यांच्या भावजय अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांचा निसटत्या मतानं पराभव करतील. शिरुर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमोल कोल्हे हे अजित पवार गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव करण्याची शक्यता आहे. तर अहमदनगरमध्ये भाजपाचे उमेदवार विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके यांचा विजय निश्चित मानला जात असून साताऱ्यात भाजपाचे उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांचा विजय निश्चित मानला जातो. अशाप्रकारे पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटाच्या 4 जागा निवडून येतील असा अंदाज आहे. तर शिर्डीत शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात रंगतदार सामना झाला असून यामध्ये वाकचौरे बाजी मारतील अशी अपेक्षा आहे.
विदर्भात मुनगंटीवारांना धक्का? : विदर्भात लोकसभेच्या एकूण 10 जागा असून सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमरावती मतदारसंघात भाजपाच्या नवनीत राणा यांचा काँग्रेसचे बळवंत वानखडे मोठ्या मतांनी पराभव करतील असा अंदाज असून चंद्रपुरमध्ये भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांचा सामना काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्याशी झाला असून इथं प्रतिभा धानोरकर यांचं पारडं जड मानलं जातय. तर यवतमाळ-वाशिम मध्ये शिवसेना शिंदे गटानं राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली व त्यांचा सामना उद्धव ठाकरे गटाचे संजय देशमुख यांच्याशी झाला असून संजय देशमुख विजयी होतील अशी खात्री आहे.
मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांचा जोर? : मराठवाड्यात लोकसभेच्या एकूण 8 जागांपैकी औरंगाबादमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदिपान भुमरे यांचा सामना उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांच्याशी झाला असून इथं चंद्रकांत खैरे विजयी होतील. तर उस्मानाबादमध्ये उद्धव ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांची लढत अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांच्याशी झाली असून इथं ओमराजे निंबाळकर यांच्या विजयाची पूर्ण खात्री आहे. परभणीमध्ये रासपचे महादेव जानकर यांचा सामना उद्धव ठाकरे गटाचे संजय जाधव यांच्याशी झाला असून इथंही महादेव जानकर यांचा निसटत्या मतांनी पराभव होईल अशी शक्यता आहे.