मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी जवळपास एक महिन्याचा कालावधी आहे. अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटला नाही. रविवारी भाजपाने 99 जणांची पहिली यादी जाहीर केली. तर दुसरीकडं महाविकास आघाडीमध्ये विदर्भातील 12 जागांवरून एकमत होत नाही.
कोणाला मिळणार विधानसभेचं तिकिट :राज्यातसध्या जागा वाटपावरून बैठकांचं सत्र सुरू आहे. त्यातच उमेदवारीच्या तिकिटासाठी अनेक इच्छुकांची भाऊगर्दी असल्याचं चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवारांनी आपण विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं बोलून दाखवलंय. त्यामुळं कुठल्या पराभूत उमेदवारांच्या गळ्यात विधानसभेचं तिकिट जाणार, याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
इच्छुक उमेदवार कोण? : भाजपाने रविवारी पहिली यादी जाहीर केली आहे. यात जे पूर्वी आमदार आहेत, त्या बहुसंख्य उमेदवारांना तिकीट दिलंय. दुसरीकडं ईशान्य मुंबई लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार मिहिर कोटेचा हे इच्छुक होते आणि त्यांना भाजपाने तिकिट दिलंय. बोरीवलीतून माजी खासदार गोपाळ शेट्टी हे विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं त्यांनी संकेत दिले आहेत. कोकणातील माजी खासदार निलेश राणे हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. दरम्यान, भाजपातून त्यांना तिकीट मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यावर ते आता शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश करणार आहेत. लोकसभा जळगाव मतदारसंघात शिवसेना (ठाकरे) करण पाटील-पवार हे पराभूत झाले होते. ते विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
पुन्हा विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक उमेदवार :रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे (शरद पवार) श्रीराम पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, पाटील देखील विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (शिंदे गट) राहुल शेवाळे यांचा दारुण पराभव झाला होता. मात्र, राहुल शेवाळेंनी विधानसभा निवडणूक लढवावी असं पक्षाकडून सांगण्यात आलंय. जर पक्षाने आपल्यावर जबाबदारी दिली तर याचा नक्की विचार करु, असं शेवाळेंनी म्हटलंय. तर दक्षिण मुंबई लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या अरविंद सांवत यांनी यामिनी जाधव यांचा पराभव केला होता. मात्र भायखळा विधानसभा मतदारसंघात सध्या यामिनी जाधव या आमदार आहेत. आपण पुन्हा विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं जाधव यांनी म्हटलंय.
निवडणुकीसाठी अमोल कीर्तीकर इच्छुक : लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे नाशिकमधून हेमंत गोडसे हे पराभूत झाले होते. परंतु त्यांना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. दरम्यान, वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात माजी खासदार प्रिया दत्त यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. याबाबत पक्षाने जर जबाबदारी दिली तर विचार करु असं प्रिया दत्त यांनी म्हटलंय. नांदेड लोकसभा मतदारसंघात प्रताप पाटील-चिखलीकर हे पराभूत झाले होते. तर ते सुद्धा विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. लोकांच्या भावनेचा विचार करुन तिकीट देण्याबाबत पक्ष नक्की विचार करेल, असं चिखलीकर यांनी म्हटलंय. दरम्यान, उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीत शिवसेना (ठाकरे गटाचे) अमोल कीर्तीकर यांचा थोडक्यात पराभव झाला होता. यानंतर हा पराभव त्यांच्या जीव्हारी लागला. मात्र आता विधानसभा निवडणुकीसाठी अमोल कीर्तीकर हे इच्छुक असल्याचं बोललं जातंय.
इलेक्टिव्ह मेरिटचा निकष : एकीकडं लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र अशा उमेदवारांना पक्षांकडून तिकीट दिलं जाऊ शकतं का? असा प्रश्न राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांना विचारला असता, "लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक यांची गणित वेगवेगळं असतं. एका लोकसभा निवडणूक मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळं एखाद्या विधानसभा मतदारसंघात इलेक्टिव्ह मेरिटचा निकषावर उमेदवाराचा विचार पक्षाकडून होतो. आता लोकसभा निवडणुकीत जे उमेदवार पराभूत झालेत आणि ते जर आता विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढवण्यास इच्छुक असतील. मात्र, इलेक्टिव्ह मेरिटच्या निकषात जर ते बसत असतील तर नक्कीच त्यांना पक्षाकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे.
मतदारसंघात इलेक्टिव्ह मेरिट :यामध्ये उमेदवाराची कामगिरी याचाही विचार केला जाऊ शकत नाही. तर त्या विधानसभा मतदारसंघात इलेक्टिव्ह मेरिट आणि लोकसभा निवडणुकीत पराभूत उमेदवाराला किती मतं मिळाली होती. याचंही गणित आणि समीकरण यांचा विचार केला जातो. शेवटी काय तर लोकसभा निवडणुकीचे जे उमेदवार पराभूत झालेत. ते विधानसभा निवडणुकीत इच्छुक असतील आणि ते इलेक्टिव्ह मेरिटच्या निकषात बसत असतील तर नक्कीच त्यांना तिकीट मिळू शकते", असं राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना म्हटलंय.
हेहा वाचा -
- बाळासाहेब थोरात हे तालुक्याचा स्वाभिमान; वाकड्या नजरेने पाहाल तर...जयश्री थोरात यांचा इशारा
- महायुतीमधल्या वाशिमच्या संभाव्य उमेदवारांचं भविष्य टांगणीला, आता इच्छुकांना दुसऱ्या यादीची प्रतीक्षा
- उमेदवारांच्या यादीत डावलल्यानं भाजपा नेते श्रीनाथ भिमाले नाराज, कोणती भूमिका घेणार?