मुंबई Lok Sabha Elections 2024 :लोकसभा निवडणूक 2024 च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 11 मतदार संघात मतदान होणार आहे. यात कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांच्या विरोधात संजय मंडलिक (Sanjay Mandlik) तर साताऱ्यात उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांच्या विरोधात शशिकांत शिंदे असा मोठा सामना रंगणार आहे. दुसरीकडं बारामती लोकसभा मतदार संघात नणंद भावजयीचा सामना रंगणार आहे. बारामती लोकसभा मतदार संघाकडं देशभराचं लक्ष लागलं आहे. ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे विद्यमान अध्यक्ष अजित पवार या काका पुतण्यांच्या राजकारणाचा कस पाहणारी ही निवडणूक होणार आहे. दुसरीकडं कडक उष्णतेमुळं राजकीय पक्षांना मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय.
छत्रपती शाहू महाराज आणि उदयनराजे रिंगणात :लोकसभा निवडणूक 2024 च्या तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी मतदान पार पडणार आहे. यात रायगड, बारामती, उस्मानाबाद (धाराशिव), लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या 11 मतदार संघात मतदान होणार आहे. यातील सातारा, बारामती, रायगड, माढा, सांगली इथं महत्वाच्या लढती होत आहेत. यात कोल्हापूर लोकसभा मतदार संघात छत्रपती शाहू महाराज आणि सातारामध्ये छ. उदयनराजे भोसले रिंगणात आहेत. या लढतीकडं राज्यभरातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे.
बारामतीत नणंद भावजयीच्या लढतीत प्रतिष्ठा पणाला :बारामती लोकसभा मतदार संघात शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बारामतीत नणंद भावजयीची थेट लढत होत आहे. या लढतीकडं देशभराचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात वितुष्ट आलं. त्यानंतर अजित पवार यांनी भाजपासोबत सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांच्याविरोधात कोण उमेदवार राहील, याबाबत मोठी चर्चा रंगली होती. इथं अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यानं सुप्रिया सुळे यांच्यासमोर तगडं आव्हान उभं केलं.