मुंबई Badlapur Encounter Case : बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली. अक्षय शिंदेला बदलापूर येथे घेऊन जात असताना, त्यानं पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळी झाडली. पोलिसांनी सेल्फ डिफेन्ससाठी अक्षयवर गोळ्या झाडल्या व त्यात त्याचा मृत्यू झाला.
सरकारवर गंभीर आरोप : 'एसआयटी' पथकातील पीएसआय नीलेश मोरे आणि संजय शिंदे हे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. प्रत्यक्षात आरोपी शिंदेनं पोलिसांवर गोळीबार केला. या प्रकरणावर विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
हलगर्जीपणा संशयास्पद : "बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती. परंतू या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय, असे भासते. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तूस्थिती समोर येणं अपेक्षित आहे," अशी प्रतिक्रिया देत शरद पवारांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय.
एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह सेट : "बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्याचं वृत्त समजले. स्वसंरक्षणाचा हा बनाव विश्वास ठेवण्यासारखा नाही. दोन्ही हातात बेड्या असलेला माणूस पोलिसांचेही पिस्तूल कसे हिसकाऊ शकतो. सदर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे जेवढा दोषी होता तितकेच दोषी शाळा चालक भाजपा पदाधिकारी देखील आहेत. आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी आणि प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह सेट केले जात आहे," असं म्हणत गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांनी सरकारवर केलेत.