मुंबई INDIA Rally Mumbai : केंद्रीय निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुक कार्यक्रमाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानंतर मुबंईतील शिवाजी पार्कवर 'इंडिया' आघाडीची पहिली जाहीर सभा पार पडली. यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 'मोदी की गॅरंटी'वरुन नरेंद्र मोदींवर टीका केली.
भाजपापासून मुक्ती : विरोधकांच्या या सभेत शरद पवार म्हणाले की, "देशात जी परिस्थिती आहे, त्यात बदल करण्याची गरज आहे. आपल्याला सर्वांनी मिळून हा बदल घडवायचा आहे. त्यातून बदल घडू शकतो. ज्या लोकांनी देशाला वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासन देऊन फसवलं, त्यांना मतदानाच्या माध्यमातून दूर करावं लागेल. ज्यांच्या हातात सत्ता होती त्यांनी अनेक आश्वासन दिली होती. आश्वासन देऊन पूर्ण करत नसलेल्या लोकांना सत्तेपासून दूर केलंच पाहिजे. आपल्याला पुढील महिन्या संधी मिळालीय." पुढं बोलताना पवार म्हणाले, "टीव्हीवर आपण मोदी की गॅरंटी ऐकलीय. मात्र आता मोदी की गॅरंटी चालणार नाही. महात्मा गांधी यांनी 1942 मध्ये छोडो भारतचा नारा दिला होता. याचं शहरातून आपण छोडो भाजपा आणि भाजपापासून मुक्ती असा नारा देण्याचा निर्धार करायला हवा," असं आवाहन शरद पवार यांनी केले.
सोबत असो किंवा नसो लढावं लागेल : वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी आणि इंडिया सोबत आहे की नाही, याविषयी संभ्रम मिटलेला नाही. मात्र प्रकाश आंबेडकर यांना सभेसाठी निमंत्रण दिल्यानंतर सभेला हजेरी लावली. " आपणाला ईव्हीएम विरोधात लढा उभारावा लागणार आहे. यात राहुल गांधींनी पुढाकार घ्यावा. आपण सोबत राहू, अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं. लोकसभा निवडणुकीत आपण सोबत असू किंवा नसू मात्र भाजपाच्या विचारधारेविरोधात आपल्याला लढावं लागणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.