मुंबई PM Narendra Modi : महात्मा गांधी यांच्या जीवनावरील चित्रपट येण्यापूर्वी महात्मा गांधी जगाला माहीत नव्हते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान अत्यंत हास्यस्पद आहे. देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीनं असं विधान करणं ही भेदाची बाब असल्याच्या प्रतिक्रिया जाणकारांनी व्यक्त केल्या आहेत. गांधीच्या दक्षिण आफ्रिकेतील लढ्यापासूनच महात्मा गांधी जगाला ज्ञात होते. म्हणून आजही देशाला गांधीचा देश म्हणून ओळखलं जातं गांधी हे देशासमोरील पर्याय नाही तर उपाय आहेत, अशा शब्दात जाणकारांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
मोदींचं विधान काय : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अत्यंत खळबळजनक दावा केला. या मुलाखतीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी जगभरात फिरलोय जगभरात मार्टिन ल्युथर किंग किंवा नेल्सन मंडेला यांना ज्या पद्धतीनं ओळख मिळाली आहे. त्या पद्धतीनं भारताला किंवा गांधीजींना जगभरात ओळख मिळाली नाही. 1982 मध्ये जेव्हा गांधी यांच्या जीवनावर चित्रपटाला त्यानंतर जगाला गांधी कळले असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या विधानाबाबत सर्वत्र उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. गांधी यांना मानणाऱ्या अनेक जाणकारांनी याबाबत अत्यंत तिखट शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
वैचारिक दिवाळखोरीचं लक्षण : यासंदर्भात बोलताना ॲड असीम सरोदे म्हणाले की, "महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत गेले होते. ते तय्यब अली यांची केस चालवण्यासाठी. मात्र दक्षिण आफ्रिकेत गेल्यानंतर तिथल्या वर्णद्वेषाविरोधात गांधीनी लढा उभा केला. त्यामुळं भारतातून मोहनदास करमचंद गांधी नावाचा व्यक्ती निश्चितच आफ्रिकेत गेला. पण परतताना सत्य अहिंसा आणि सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारा गांधी नावाचा नेता भारतात परत आला. त्यामुळं तेव्हाच जगाला गांधींची ओळख झाली होती. भारतात आल्यानंतर गोपाळकृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार गांधींनी भारतभरात फिरायला सुरुवात केली. त्यांनी चंपारण्य इथं केलेल आंदोलन आणि सत्याग्रह यशस्वी केला. तेव्हाच जगाला गांधीची ओळख झाली होती. स्वातंत्र्य लढ्यात गांधीनी केलेले अतुलनीय काम आणि त्यांनी दिलेलं योगदान रक्ताचा एक थेंबही न सांडता केलेली क्रांती, ही गांधींच्या नेतृत्वाखाली देश एकवटला असताना गांधीचा तुरुंगात खूप छळ करण्यात आला. जनरल स्टन्स यानं गांधीचा छळ केला असला, तरी स्वतः चप्पल शिवून गांधीजींना दिली जगभरातील मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला यांच्यासह बराक ओबामापर्यंत सर्वांनीच गांधीच्या कार्याची महती गायली आहे. त्यामुळं गांधीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढलेले हे उद्गार त्यांच्या वैचारिक दिवाळखोरीचं लक्षण आहे. गांधींचं मोठेपण स्वीकारता येत नाही म्हणून मग त्यांच्यावर अशा पद्धतीनं सूड उगवायचा प्रयत्न सातत्यानं संघाच्या लोकांनी केला आहे त्याचंच हे लक्षण आहे."
गांधी उपाय आहे पर्याय नाही :महात्मा गांधी हे कोणत्याही काळात देशाच्या विस्कटलेली घडी आणि अराजकतेला असलेला उत्तम उपाय आहे. गांधी हा विचार कधीच पर्याय नव्हता. त्यामुळं गांधीजींचा विचार करताना उपाय म्हणूनच केला गेला पाहिजे, अशी प्रतिक्रिया गांधी टॉक्स चित्रपटाचे दिग्दर्शक किशोर बेळेकर यांनी व्यक्त केलीय. गांधी हे ज्यांच्या पचनी पडत नाही, ते लोक नेहमीच गांधींचा दुस्वास करताना दिसतात. ज्या देशाला जगभरात गांधीचा देश म्हणून ओळखलं जातं त्या देशात गांधी चित्रपटापूर्वी कोणाला माहित नव्हते हे पंतप्रधानांचे विधान म्हणजे मूर्खपणाचे लक्षण आहे, अशा पद्धतीचं विधान करणं ही खूप मोठी शोकांतिका आहे. गांधी हे जगाला आधीपासूनच माहित होते आणि म्हणूनच जगभरात गांधी विचारांचे समर्थक आणि पुतळे आपल्याला पाहायला मिळतात असंही बेळेकर म्हणाले.