सातारा Eknath Shinde On Uddhav Thackeray : सातारा जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज (9 मार्च) दरे येथील बांबू मूल्यवर्धन केंद्र, टसर रेशीम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्पाचं लोकार्पण, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ आणि पाटणमधील दरडग्रस्तांच्या पुनर्वसन या प्रकल्पाचं भूमिपूजन झालं. त्यानंतर तेथे घेतलेल्या सभेत बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तसंच घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा मी मुख्यमंत्री नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे? : यावेळी बोलत असताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "राज्यात सातशे ठिकाणी 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ' सुरू केला आहे. याचं कारण म्हणजे सरकारने घेतलेले निर्णय, केलेलं काम, यामुळं विरोधकांना उठलेला पोटशूळ, झालेली पोटदुखी त्यांचा इलाज पण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात मोफत होतोय", असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. तसंच हे सर्वसामान्यांचं आणि संकट काळात लोकांना वाचवणारं सरकार आहे. घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा मी मुख्यमंत्री नाही, असा टोलाही यावेळी त्यांनी नाव नं घेता उद्धव ठाकरेंना लगावला. तर सोन्याचा चमचा घेऊन ज्यांचा जन्म झाला, त्यांनाच मुख्यमंत्री होण्याचा अधिकार आहे का? शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये का? हेलिकॉप्टरमधून फिरू नये, असं काही बंधन आहे का? का फक्त व्हिडिओग्राफी करत हेलिकॉप्टरने फिरावं, असा काही नियम आहे?, असे सवाल करत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.