पुणे :राज्यात लवकरच आचारसंहिता जाहीर होणार असून विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत सुरू असताना अद्याप कोणत्याही पक्षाकडून उमेदवार जाहीर करण्यात आले नाहीत. अशातच आता भाजपामधील इच्छुकांनी उमेदवार ठरलेले नसतानासुद्धा उमेदवारी मिळेल, या आशेनं तयारी सुरू केलीय.
कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु :पर्वती मतदारसंघातील भाजपा पक्षाचे नेते आणि माजी सभागृह अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी कागदपत्रांची जुळवाजुळवी करत महापालिकेकडे थेट विविध विभागांमधील थकबाकी नसलेलं ना हरकत प्रमाणपत्र मागितलं आहे. त्यामुळं पर्वती मतदारसंघात इच्छुक उमेदवार श्रीनाथ भिमाले यांच्या नावाची चर्चा सुरू झालीय.
भाजपा पक्षाचे नेते श्रीनाथ भिमाले यांची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter) कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू : श्रीनाथ भिमाले यांनी आपण पर्वती मतदारसंघासाठी इच्छुक असून निवडणूक लढविणार असल्याचं सांगत कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली. पुणे महापालिकेच्या विविध विभागांचं थकबाकी नसलेलं ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळण्यासाठी भिमाले यांनी काल पुणे महापालिकेकडे अर्ज केला. कोणत्याही उमेदवाराला निवडणुक लढवण्यासाठी कोणत्याही करांची थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्र उमेदवारी अर्जासोबत जोडणं बंधनकारक असतं. थकबाकीदार असलेल्या उमेदवारांच्या अर्जावर कुणी आक्षेप घेतल्यास आणि त्यात तो थकबाकीदार असल्याचं आढळून आल्यास त्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरविला जातो. यामुळंच श्रीनाथ भिमाले यांनी कागदपत्रांची जुळवाजुळवी करण्यासाठी महापालिकेत अर्ज केलाय.
निवडणुकीसाठी माझी पूर्ण तयारी :पुण्यातील पर्वती मतदारसंघात भाजपाच्या आमदार माधुरी मिसाळ गेल्या 15 वर्षांपासून या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी श्रीनाथ भिमाले यांनीही पक्षाकडून उमेदवारी मागितली असून त्यांनी पर्वती मतदारसंघात जोरदार तयारी केलीय. याबाबत श्रीनाथ भिमाले यांना विचारलं असता ते म्हणाले की, "गेल्या पंधरा वर्षांपासून मी पर्वती विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असून तयारी करत आहे. मात्र, मला पक्षाकडून वेळोवेळी रोखण्यात आलं. पण आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माझी पूर्ण तयारी झालीय. विद्यमान आमदार आमच्या पक्षाचे असले तरी मी पक्षाकडे माझी इच्छा व्यक्त केलीय. सणासुदीचे दिवस येऊन ठेपल्यानं महापालिकेला सुट्टी लागणार असून, अनेक निवडणुकांचा अनुभव असल्यानं कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे."
पुण्यातील पर्वती मतदारसंघात आमदार माधुरी मिसाळ या विद्यमान आमदार असून अद्यापही भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, इच्छुक उमेदवार श्रीनाथ भिमाले यांनी महापालिकेत केलेल्या या अर्जामुळं शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा
- महिला अत्याचाराच्या घटनांवरुन सुप्रिया सुळे आक्रमक; म्हणाल्या, "आता वेळ आलीय..."
- राहुल, प्रियंका अन् खरगे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत, संजय राऊतांचा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला उपरोधिक टोला
- मनसेचा स्वबळाचा नारा, 'इतक्या' जागांवर लढणार निवडणूक