मुंबई Dharavi Redevelopment Project : धारावी पुनर्वसन प्रकल्पावरुन शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये सध्या जोरदार 'वाकयुद्ध' रंगलं आहे. "शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचा धारावी पुनर्वसन प्रकल्पाला विरोध म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केवळ पैसे उकळण्यासाठीच धारावीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे वळवळ करत आहेत," असा घणाघात शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी केला.
निरुपम यांचं ठाकरेंना आव्हान : "धारावी प्रकल्पातील झोपडपट्टीवासियांची कुठलीही तळमळ अथवा कणव उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना नाही. तर केवळ अदानी यांच्याकडून निवडणुकीपूर्वी पैसे उकळण्यासाठी धारावी पुनर्वसन प्रकल्पाला विरोध केला जात आहे," असा गंभीर आरोप शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी केला. "हिम्मत असेल तर उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन जाहीर करावं की, त्यांनी निधी घेतला नाही," असं आव्हान निरुपम यांनी केलं.
अदानींना कोणामुळं टेंडर मिळालं? :"2019 मध्ये सुरुवातीला महायुतीचं सरकार असताना धारावी पुनर्वसन संदर्भात अदानींऐवजी दुसऱया एका कंपनीला टेंडर मिळालं होतं. मात्र, 2020 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं हे टेंडरच रद्द केलं आणि अदानींना वाट मोकळी करून दिली. त्यावेळी कुणाच्या दबावाखाली ठाकरे यांनी हा निर्णय घेतला? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि अदानींचे काय संबंध आहेत? हे सर्वांना माहिती आहे," असं म्हणत या सर्व प्रकरणाला उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच जबाबदार असल्याचं संजय निरुपम यांनी सांगितलं.