मुंबई Thackeray Vs Fadnavis : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये टोकाचे आरोप प्रत्यारोप होत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मातोश्री (Matoshree) येथे उद्धव ठाकरे यांची गुप्त भेट घेतल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते तसंच उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी केल्यानं राजकीय खळबळ उडाली आहे. सिद्धार्थ मोकळे यांनी केलेला हा दावा किती खरा किंवा खोटा यापेक्षा यापूर्वीची राजकीय समीकरणे पाहता राजकारणात काहीही अशक्य नसल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
वंचित बहुजन आघाडीकडे विश्वासार्ह बातमी?: उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजपाने २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक एकत्र लढवली होती. परंतु निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या मुख्यमंत्रीपदाच्या वादावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबतची युती तोडली आणि त्यानंतर राज्यात नवीन समीकरणं उदयास आली. आता पाच वर्षांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी खळबळजनक दावा केलाय. मोकळे यांच्या म्हणण्यानुसार, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि भाजपामधील राजकीय घटनाक्रमाबद्दल त्यांच्याकडं एक विश्वासार्ह बातमी आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी 25 जुलै रोजी मध्यरात्री २ च्या सुमारास दिल्लीत, ७ डी मोतीलाल मार्ग या ठिकाणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली आहे.
उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण द्यावं : एकीकडं दिल्लीमध्ये ही भेट झाली असताना दुसरीकडं ५ ऑगस्टच्या मध्यरात्री १२ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे ही भेट घेण्यासाठी फडणवीस स्वतः एकटे गाडी चालवत उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर गेले होते आणि ही बैठक जवळपास दोन तास चालली होती. तसंच या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी ६ ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे हे दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते. आता दिल्ली दौऱ्यावर जाताना उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोण होतं आणि त्यांनी दिल्लीत कोणाच्या भेटीगाठी घेतल्या? हे आता उद्धव ठाकरे यांनी स्वतः जनतेला सांगावं, असंही सिद्धार्थ मोकळे यांनी आवाहन केलं.