नवी दिल्ली Devendra Fadnavis Met PM Narendra Modi : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रविवारी (28 जुलै) सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा होत्या.
मोदींना भेटून नवीन ऊर्जा मिळते : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशीर्वाद नेहमीच महाराष्ट्राला आहे आणि राहील. प्रत्येक वेळी जेव्हा आपण त्यांना भेटतो तेव्हा आपल्याला नवीन ऊर्जा मिळते आणि त्यांचे मार्गदर्शन मिळते. कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेण्याची संधी मिळाली," अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी भेटीनंतर बोलताना व्यक्त केली. तसंच अमूल्य वेळ दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.
फडणवीसांना मानाचं स्थान : भाजपानं देशातील भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांना मानाचं स्थान देण्यात आल्याचं दिसून आलं. बैठक मुख्यमंत्र्यांची होती. मात्र, उपमुख्यमंत्री असूनही ते पहिल्या पक्तींत असल्याचं दिसलं. या बैठकीच्या रुपानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत मानाचं स्थान कायम असल्यांचं राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
दिल्लीत भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक : बैठकीत पहिल्या रांगेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दुसऱ्या बाजूला आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सर्मा आहेत. सर्मा यांच्या बाजूला देवेंद्र फडणवीस बसलेले पाहायला मिळत आहेत. 27 आणि 28 जुलै अशा दोन दिवसांसाठी ही बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला देशातील भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.