कोल्हापूर: जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात आपलं नशीब आजमावणाऱ्या तब्बल 121 उमेदवारांपैकी 100 उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालय. यामध्ये माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील तसंच बहुजन समाज पार्टीसह महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी पक्ष आदी विविध राजकीय पक्ष संघटनांतील उमेदवारांचा समावेश आहे. तब्बल पाच लाखांहून अधिक रुपयाचं डिपॉझिट जप्त झालय.
121 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात :यंदा जिल्ह्यात विधानसभा निवडणूक मोठ्या चुरशीनं पार पडली. मताच्या विभागणीसाठी राजकीय पक्षांनी केलेल्या राजकीय खेळी, अनेक अपक्ष आणि छोट्या-मोठ्या पक्षातील उमेदवारांना पाठबळ दिल्याचं दिसून आलं. त्यामुळं जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात तब्बल 121 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. प्रमुख सत्ताधारी पक्षातील महायुतीचे दहा विरुद्ध महाविकास आघाडीचे दहा अशा दुरंगी लढतीचं चित्र सर्वत्र दिसून आलं. महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या प्रचार सभांनी प्रचारात रंगत आणली होती. त्या तुलनेत बहुजन समाज पार्टी तसंच वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, स्वाभिमानी पक्ष यांचा प्रचारात प्रभाव दिसून आला नाही.
100 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त :या निकालात एकूण 121 उमेदवारांपैकी तब्बल 100 उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालय. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, चंदगड, इचलकरंजी आणि शाहूवाडी मतदारसंघातील सर्वाधिक उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालय. तर तब्बल 111 उमेदवारांना या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं, तर विजयी झालेले 10 उमेदवार आणि प्रमुख विरोधी पराभूत 10 उमेदवारांसह इतर तिघे असे एकूण 23 जणांचं डिपॉझिट वाचलं आहे. खुल्या प्रवर्गातीत उमेदवारांना 10 हजार आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांना 5 हजार डिपॉझिट होतं.