मुंबई Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. मात्र, असं असलं तरी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar)यांनी अद्याप आम्ही प्रचाराला सुरुवातच केली नसल्याचं पत्रकार परिषदेत म्हटलंय. तर यावेळी बोलताना त्यांनी महायुतीमध्ये कोणताही जागा वाटपाचा तिढा नसल्याचं स्पष्ट केलंय.
शरद पवारांची दुटप्पी भूमिका :राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी 2014 मध्ये भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर त्यांनी 2019 मध्ये जर शिवसेनासोबत असेल तर आम्ही येणार नाही अशी आदी भूमिका घेतली होती. शिवसेना संपवून राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न सातत्यानं दिसून आला आहे. त्यामुळं अजित पवार यांना व्हिलन ठरवून शरद पवार यांच्या भूमिकेला सहानुभूती देण्यात काहीही अर्थ नाही. शरद पवार यांनी नेहमीच दुटप्पी भूमिका घेतली आहे आणि त्यांनी जाणून-बुजून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवार यांच्या भूमिकेचं समर्थन करताना आणि त्यांना मतदारांनी कशी मदत केली पाहिजे, असं आवाहन करताना त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.
शिवसेना बॅकफूटवर नाही : शिवसेनेने पालघर, ठाणे आणि नाशिक, रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागांवर दावा सांगितला आहे. मात्र, यापैकी रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजपाचे उमेदवार नारायण राणे यांना जाहीर करण्यात आली आहे. पालघर आणि नाशिकमध्येही भारतीय जनता पक्षाकडं उमेदवारी जाण्याची शक्यता आहे. या निमित्तानं शिवसेना बॅक फुटवर गेली आहे का? असं विचारलं असता केसरकर म्हणाले की, जागा वाटपामध्ये बॅलन्स साधावा लागतो. काही जागा मागेपुढे होतात याचा अर्थ आम्ही बॅक फुटवर गेलो असा होत नाही, असं सांगून त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय.