मुंबई DCM Devendra Fadnavis : मंत्रीपदावरुन राष्ट्रवादी काँग्रेसनं नाराजी व्यक्त केलीय. दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मंत्रीपदावरुन बैठक पार पडली. त्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थिती लावली. मात्र, बैठकीतून राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणाऱ्या मंत्रीपदावरुन तोडगा काही सुटलेला दिसत नाही. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही एका राज्य मंत्रिपदाचा प्रस्ताव दिला होता, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.
राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार : दरम्यान, माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "सर्वांना समजेल आपल्या प्रेक्षकांना साध्या आणि सरळ भाषेत समजेल असं मी सांगतो. राष्ट्रवादी काँग्रेसला एक मंत्रिपदाचा प्रस्ताव आमच्याकडून देण्यात आला होता. राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार ही जागा त्यांना त्या ठिकाणी देण्यात आली होती." मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह कॅबिनेट मंत्रिपदाचा होता. राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हा दर्जा कॅबिनेट मंत्रीपदाच्या दर्जासारखाच असतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसची ही अडचण होती की, कॅबिनेट मंत्रीपदावर राहिलेल्या प्रफुल पटेलांना राज्यमंत्रीपदावर आणू शकत नाही. त्यामुळं त्यांनी राज्यमंत्री पदाची ऑफर स्वीकारली नाही. एनडीएत मित्रपक्ष, घटक पक्ष आहेत. त्यांच्यासाठी एक निकष ठेवावा लागतो. हा निकष मोडता येत नाही. पण मला विश्वास आहे की, भविष्यामध्ये जेव्हाही मंत्रीमंडळ विस्तार होईल त्यावेळी निश्चितपणे त्यांचा विचार त्या ठिकाणी होईल, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.