मुंबई DCM Ajit Pawar Meet CM Eknath Shinde : एकीकडं सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु असताना दुसरीकडं गणेशोत्सवाच्या निमित्तानं राजकीय घडामोडींना सुद्धा वेग आला आहे. बुधवारी मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल पटेल त्याच्यासोबत मंत्री उदय सामंत, दादा भुसे यांच्यात बरीच राजकीय खलबत्त रंगली. रात्री उशिरा जवळपास तीन तास ही चर्चा रंगली. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ही चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
अजित पवारांनी उमेदवार घोषित केल्यानं नाराजी : विधानसभा निवडणुका तोंडावर असताना याचा फायदा गणेशोत्सवामध्ये कसा करुन घेता येईल याकडं सर्व राजकारण्यांचं लक्ष लागलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यापासून पळ काढणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पाच्या दर्शनाच्या निमित्तानं भेट दिली. याप्रसंगी त्यांच्यासोबत खासदार प्रफुल पटेल, मंत्री उदय सामंत, दादा भुसे सुद्धा उपस्थित होते. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जागावाटप संदर्भामध्ये या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यांच्या मुंबई दौऱ्यात दिलेल्या आदेशाप्रमाणे जिंकून येणाऱ्या जागेला प्राधान्यानं मंजुरी देण्यात येणार आहे. तसंच जागा वाटपासोबत उमेदवारही लवकरात लवकर घोषित करण्याचे प्रयत्न असणार आहेत. विशेष म्हणजे जागा वाटपात कुठंही मतभेद होणार नाहीत. तसंच सामंजस्यपणानं जागा वाटपाचा तिढा कसा सोडवता येईल याबाबत ही चर्चा झाली. अजित पवारांनी आतापासूनच काही मतदारसंघात उमेदवारांची घोषणा करणं सुरु केल्यानं त्यावरुन महायुतीत वाद निर्माण झाला आहे. यामुळं शिवसेना शिंदे गट, भाजपा तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात राज्यभरात समोरासमोर लढणाऱ्या जागांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.