प्रतिक्रिया देताना मोहन जोशी पुणे Lok Sabha Election 2024 :आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून पहिली यादी जाहीर करण्यात आलीय. देशात विरोधकांनी केलेल्या इंडिया आघाडी तसेच राज्यातील महाविकास आघाडीची यादी कधी जाहीर होणार? याबाबत काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांना विचारलं असता ते म्हणाले की, "येत्या 5 आणि 6 तारखेला शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर तसेच काँग्रेसचे नेते यांची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर महाविकास आघाडीची यादी जाहीर होईल."
घटक पक्षाचे अंतर्गत वाद : शनिवारी भाजपाची पहिली यादी जाहीर झाली. त्यात राज्यातील एकाही जागेवर उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. याबाबत जोशी म्हणाले की, "महायुतीमधील घटक पक्षाचे अंतर्गत वाद सुरू आहेत. अहमदनगर तसंच मावळ या दोन जागांबाबत शिवसेना आणि भाजपामध्ये वाद आहेत. हा वाद सोडवण्यासाठी अमित शाह यांना मुंबईत यावं लागतंय. त्यांच्यात वाद सुरू असल्यानं त्यांची यादी जाहीर झाली नाही."
काँग्रेस पक्ष 19 ते 20 जागा लढवणार : राज्यात काँग्रेस किती जागा लढवणार? याबाबत जोशी यांना विचारलं असता ते म्हणाले की, "काँग्रेस पक्ष 19 ते 20 जागा लढवणार आहे. बाकीच्या जागा राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना लढवणार आहे." आंबेडकर यांच्या बाबतीत जोशी म्हणाले की, "आंबेडकर हे मोठे नेते आहेत. महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडी महत्त्वाचा घटक आहे. आम्ही सर्व मिळून लोकसभेच्या या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत."
काँग्रेसचा उमेदवार विजयी होणार? : पुण्याच्या उमेदवारीबाबत जोशी म्हणाले की, "2024 ची पुणे लोकसभेची निवडणूक काँग्रेस विरुद्ध भाजपा आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी होणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडं आलेला आहे. त्यामुळं जागा वाटपाचा प्रश्न मिटला आहे. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष 19 ते 20 लोकसभेच्या जागा लढवणार आहे."
हेही वाचा -
- राहुल गांधींनी आधी काँग्रेस पक्ष सावरावा, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा खोचक सल्ला
- 'अजून युती झालेली नाही,...'; प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- भाजपाच्या दिग्गज नेत्यांचा पहिल्या यादीत पत्ता कट, दुसऱ्या यादीतील समावेशाबाबतही आहेत प्रश्नचिन्ह