महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

इंदिरा गांधींचा तिसरा मुलगा कमल घेणार हातात 'कमळ'; नाथ सोडणार काँग्रेसचा 'हाथ' - कमलनाथ भाजपा प्रवेश

Kamal Nath Joining BJP : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचे पुत्र खासदार नकुल नाथ हे अनेक नेते आणि समर्थकांसह दिल्लीत आहेत. कमलनाथ आज रात्री उशिरापर्यंत पुत्र खासदार नकुल नाथ आणि काँग्रेसच्या अनेक आमदारांसह भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 18, 2024, 1:13 PM IST

भोपाळ Kamal Nath Joining BJP : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. ते लवकरच पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असून, आज रात्रीपर्यंत त्यांच्या भाजपा प्रवेशाची औपचारिक घोषणा केली जाऊ शकते, अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिलीय. कमलनाथ यांच्यासह अनेक आमदार आणि माजी आमदार पक्ष बदलण्याची शक्यता असून, त्यामुळं महाराष्ट्रानंतर आता काँग्रेसला मध्य प्रदेशात मोठा धक्का बसणार आहे.

अनेक आमदार कमलनाथ यांच्यासोबत? : गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसची अवस्था बिकट आहे. त्यातच आता कमलनाथ यांच्यासोबत काँग्रेसचे सुमारे दीड डझन आमदार आणि तीन महापौरही भाजपामध्ये प्रवेश करु शकतात, असं बोललं जातंय. असं झाल्यास मध्य प्रदेशातील काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल. तत्कालीन जनता पक्षाचं सरकार पडल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं प्रथमच कमलनाथ यांना छिंदवाडामधून रिंगणात उतरवलं होतं. तेव्हापासून छिंदवाडा हा कमलनाथ यांचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपाच्या लाटेतही ही जागा काँग्रेसच्या हातून जाऊ शकली नाही.

कमलनाथ 43 वर्षांत 9 वेळा खासदार : छिंदवाड्यातून कमलनाथ हे 43 वर्षांत 9 वेळा खासदार राहिले आहेत. या जागेवरुन कमलनाथ यांना तिकीट देताना इंदिरा गांधींनी त्यांना आपला तिसरा मुलगा म्हटलं होतं. काँग्रेसवर कोणतंही संकट आले की कमलनाथ हे नेहमीच गांधी परिवार आणि काँग्रेससोबत आघाडीच्या रांगेत उभे राहिले. पण राहुल आणि सोनिया गांधी यांच्यावर ते बराच काळापासून नाराज होते. अशा स्थितीत कमलनाथ यांनी पक्ष सोडल्यास काँग्रेसला भगदाड पडण्याची शक्यता आहे. हे त्यांच्यासाठी मोठं राजकीय संकटही ठरु शकतं, अशी चर्चा आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची धावपळ : मध्य प्रदेशात उध्वस्त होण्याच्या मार्गावर असलेल्या काँग्रेसला वाचवण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी, विरोधी पक्षनेते उमंग सिंगर हे प्रत्येक आमदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती मिळत आहे. जिल्हास्तरावर आमदारांशी चर्चा करण्याच्या सूचना काँग्रेस संघटनेनं दिल्या आहेत. याआधी 2020 मध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्यांच्या समर्थकांसह काँग्रेस पक्षाला रामराम करत मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार पाडले होते. आता कमलनाथ स्वत:च भाजपामध्ये येत असल्यानं काँग्रेसला राजकीय मैदान वाचवणं कठीण होणार आहे, असं बोललं जातंय.

हेही वाचा :

  1. नकुल नाथ यांनी सोशल मीडियातून हटविलं काँग्रेसचं नाव, कमलनाथ यांनी ही' दिली प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details