महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

उद्योग नगरीत यंदाही सिंधी भाषिकांमध्येच सामना; सिंधी समाजाचा राजकीय वारसा ठरवणारी स्पर्धा, मतांवर परिणाम होणार का? - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील एकमेव असा मतदारसंघ आहे, जिथे सर्वाधिक सिंधी भाषिकांची संख्या आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत येथे सिंधी भाषिकांमध्येच सामना होणार आहे.

Maharashtra Assembly Election 2024
कुमार आयलानी, ओमी कलानी, भरत गंगोत्री (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 12, 2024, 8:22 PM IST

ठाणे: उद्योग नगरीत यंदा आमदारकीसाठी तीन सिंधी भाषिकांमध्येच सामना रंगताना दिसत आहे. यामध्ये महायुतीकडून भाजपाचे 'कुमार आयलानी' (Kumar Ailani), महाविकास आघाडीकडून शरद पवार पक्षाचे 'ओमी कलानी' (Omi Kalani) या प्रमुख लढती बरोबरच राष्ट्रवादीचे अजित पवार पक्षाचे बंडखोर 'भरत गंगोत्री', (Bharat Gangotri) असे तिन्ही सिंधी समाजाचे उमेदवार रिंगणात आहेत. दुसरीकडं वंचित बहुजन आघाडीचे संजय गुप्ता, आणि मनसेचे भगवान भालेराव हे देखील पूर्ण ताकदीनं निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. उल्हासनगरच्या निवडणुकीत सिंधी समाजाचे वर्चस्व कायम राहणार की, बदलाच्या नावाने कोणी नव्याने विजयी होणार यावर सर्वांचं लक्ष आहे. निवडणुकीचा निकाल कोणताही असो, परंतु यावेळी युतीसह आघाडीच्या मतांवर परिणाम होणार असल्याचं चित्र दिसून येतय.


मतदारसंघात सिंधी समाजाचं वर्चस्व :उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील एकमेव असा मतदारसंघ आहे, जिथे सर्वाधिक सिंधी भाषिकांची संख्या आहे. भारताच्या फाळणीपूर्वी ही एक लष्करी छावणी होती. परंतु फाळणीनंतर केंद्र सरकारनं या छावणीचं रूपांतर निर्वासित छावणीत केलं. सिंधी समाजानं औद्योगिक दृष्टिकोनातून आणि समर्पणाने शून्यातून हे शहर एक औद्योगिक महानगर झालं आहे. सिंधी समाजानं आपल्या मेहनतीच्या जोरावर या छावणीचं रूपांतर एका औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या सशक्त नगरीत केलं. त्याचबरोबर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही आपली ठसा उमटवला. आजही या मतदारसंघात राजकीय पातळीवर सिंधी समाजाचे वर्चस्व दिसून येते, कारण स्थापनेपासून आतापर्यंत येथे फक्त सिंधी समाजाचे आमदारच निवडून आले आहेत.


निवडून आलेले उमेदवार : उल्हासनगरच्या विधानसभा मतदारसंघाच्या स्थापनेपासून आतापर्यंत केवळ सिंधी समाजाचेच उमेदवार निवडून आले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी 1952 च्या निवडणुकीत नेवंदराम गुरबानी आणि 1957 मध्ये पराचाराम विद्यार्थी हे पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. राज्याच्या स्थापनेनंतर पराचाराम विद्यार्थी यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला. त्यानंतर, सन्मुख इसरानी यांनी दोनदा, भाजपाचे शीतलदास हरचंदानी यांनी तीनदा, तसेच पप्पू कलानी यांनी तीनदा, ज्योती कलानी यांनी एकदा आणि कुमार आयलानी यांनी भाजपाकडून दोनदा विजय झाले आहेत.

८० च्या दशकापासून राजकीय वर्चस्व : ओमी कलनी यांचे वडील माजी आमदार पप्पू कलानी यांचा राजकीय इतिहास पाहता ८० च्या दशकापासून त्याचं उल्हासनगर शहरात राजकीय वर्चस्व आहे. वयाच्या ३५ व्या वर्षी ते उल्हासनगरनगर परिषदेत नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. तेव्हापासूनच शहराच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले. चारवेळा आमदार म्हणून निवडून आले असून पहिल्यांदा १९९० मध्ये काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर मात्र राजकीय वादातून गुन्हेगारी वाढत गेली. त्यामुळं अनेक वर्ष त्यांना तुरुंगांत राहावं लागलं. विशेष म्हणजे १९९५ ते १९९९ साली तुरुंगात असताना देखील सलग दोनवेळा अपक्ष म्हणून विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले. तर २००४ साली रिपाई आठवले गटाचे आमदार म्हणून निवडणून आले. तर त्यानंतर त्यांच्या दिवंगत पत्नी ज्योती कलानी ह्या राष्ट्रवादीच्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.

सिंधी समाजाचे प्रतिनिधित्व कोण करणार ? :यंदाच्या निवडणुकीत १९ उमेदवार रिंगणात आहेत. विविध जाती धर्माचे उमेदवार रिंगणात उतरले असले तरी नेहमीप्रमाणे मुख्य लढत सिंधी भाषिक उमेदवारांमध्येच होणार, असंच स्पष्ट चित्र दिसत आहे. यंदा भाजपा-शिवसेना-रिपाई महायुतीनं विद्यमान भाजपा आमदार कुमार आयलानी यांना पुन्हा उमेदवारी दिली, तर राष्ट्रवादीचे माजी आमदार पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी यांना महाविकास आघाडीने तिकीट दिलं. कुमार आयलानी हे विद्यमान आमदार म्हणून लोकांमध्ये आपलं स्थान मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडं ओमी कलानी यांच्यासाठी ही निवडणूक मोठं आव्हान आहे. आपल्या वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचा आणि उल्हासनगरच्या विकासासाठी योगदान देण्याचा त्यांचा मानस आहे. यावेळी सिंधी समाजाच्या हक्काचे प्रतिनिधित्व कोण साधणार, हे पाहणे अत्यंत औत्सुक्याचे ठरणार आहे.



कोणता उमेदवार विजयी होणार? : उल्हासनगरच्या मतदारसंघात प्रत्येक उमेदवाराने आपापल्या पद्धतीनं निवडणूक प्रचार चालवला आहे. सिंधी समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी प्रयत्नशील असलेले उमेदवार एकमेकांना टक्कर देत आहेत, तर अन्य समाजातील उमेदवारांनी देखील आपले अस्तित्व दाखवण्यासाठी संधी मिळवण्याचा प्रयत्न केलाय. शहरातील नागरिकांनी मतदानासाठी सज्ज व्हावं, अशी अपेक्षा सर्व उमेदवारांकडून केली जात आहे. उल्हासनगरच्या या विधानसभा निवडणुकीत जे उमेदवार विजयी होतील, ते शहराच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. यामुळं कोणता उमेदवार विजयी होणार, हे पाहण्यासाठी संपूर्ण शहर उत्सुकतेनं प्रतीक्षेत आहे.

हेही वाचा -

  1. कैलाश विजयवर्गीय यांच्या नेतृत्वात मध्यप्रदेशातील भाजपा कार्यकर्ते फडणवीस यांच्या मतदारसंघात; पाहा व्हिडिओ
  2. VIDEO : उद्धव ठाकरे यांची औसामध्ये पुन्हा एकदा तपासली बॅग; म्हणाले, "या, लाजू नका..."
  3. शेतकऱ्यांना कर्जमाफी अन् दिवसा मोफत वीज; पालघरमधील सभेत देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन

ABOUT THE AUTHOR

...view details