सातारा CM Eknath Shinde : केंद्र सरकारने लोकहिताच्या अनेक योजना आणल्या. त्याला राज्य सरकारनेही लाडकी बहीणसारख्या योजनांची जोड दिली. अशा समाजहिताच्या योजनांना विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीचा जनता मतपेटीतून एन्काऊंटर करेल, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच लाडकी बहीण योजना कोणीही बंद पाडू शकणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं.
दुटप्पी लोकांपासून सावध राहा :पाटण विधानसभा मतदार संघातील विकासकामांच्या लोकार्पणानंतर आयोजित सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुती सरकारने विकासाचं काम केलं, लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, अशा जनताभिमुख योजना आणल्या. मात्र, विरोधक त्याच्या विरोधात बोलत आहेत. अशा दुष्ट आणि दुटप्पी लोकांपासून जनतेनं सावध राहावं.
सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ETV Bharat Reporter)
... तो खुद की भी नही सुनता : विरोधकांनी लाडकी बहीण योजना बंद पाडायचा प्रयत्न केला. आमचं सरकार आल्यावर ही योजना बंद पाडू, असंही विरोधक म्हणाले. परंतु, हा तुमचा भाऊ तुमच्यासोबत आहे. त्यामुळं काळजी करायचं काम नाही. लाडकी बहीण योजना निवडणुकीसाठी सुरू केलेली नाही. कोणीही आलं तरी ही योजना कायम सुरू राहणार असल्याचा शब्द मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. तसंच 'एक बार जो मैने कमिटमेंट कर दी, तो मै खुद की भी नही सुनता', असा डायलॉगही त्यांनी मारला.
पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना पंधराशे रूपयांचं मोल काय कळणार? : सरकार सर्वसामान्यांसाठी असतं. हे सरकार देखील सर्वसामान्यांचं सरकार आहे. केंद्राच्या योजनांना राज्य सरकारने लोकाभिमुख योजनांची जोड दिली आहे. परंतु, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या, पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना पंधराशे रूपयांचं मोल काय कळणार, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.
हेही वाचा -
- आनंदाची बातमी! 'लाडक्या बहिणीं'चा तिसरा हप्ता 'या' दिवशी येणार - Ladki Bahin Yojana
- 'लाडक्या बहिणी'चा तिसरा हफ्ता कधी जमा होणार? किती कोटी खर्च - Ladki Bahin Yojana
- "भावांनो, योजनेचे पैसे बँकेनं कट केले"; लाडक्या बहिणींची आर्त हाक, महिलेला रडू कोसळलं - Majhi Ladki Bahin Yojana