प्रतिक्रिया देताना सचिन अहिर अभिनेत्री अतिशा नाईक (Mumbai Reporter) मुंबई Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील अंतिम टप्प्याचं मतदान आज तेरा मतदारसंघांमध्ये पार पडलं. यात मुंबईतील सहा आणि ठाणे कल्याण या मतदारसंघांचा समावेश होता. सकाळपासून मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या, दुपारी बारा वाजेपर्यंत मतदान चांगल्या प्रकारे सुरू होतं. मात्र, मुंबई शहरामध्ये आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात दुपारी उन्हाचा तडाखा जाणवत होता. त्यामुळं मतदारांनी मतदान केंद्रांकडं पाठ फिरवली होती. दुपारी मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता. तर काही ठिकाणी मतदान धीम्या गतीनं सुरू (Slow Voting In Mumbai) होतं.
संथ गतीनं मतदानाचा विरोधकांचा आरोप : अनेक मतदारसंघांमध्ये संथ गतीनं मतदान सुरू असल्याचा आरोप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आला. ज्या मतदान केंद्रावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अधिक मतदान होण्याची शक्यता होती, तिथं जाणून-बुजून मतदान यंत्रामध्ये बिघाड असणं, त्या योग्य पद्धतीनं न लावणं आणि मतदारांचे मतदान करून घेण्यास उशीर करणं अशा पद्धतीच्या गोष्टी घडत असल्याची तक्रार ठाकरे यांनी केलीय.
मतदानाची प्रक्रिया संथ गतीनं सुरू होती: या संदर्भात बोलताना आमदार सचिन अहिर म्हणाले की, मुंबईत खास करून ईशान्य मुंबई आणि दक्षिण मुंबईत मतदानाची प्रक्रिया खूप संथ गतीनं सुरू होती. शिवाजीनगर, मानखुर्द घाटकोपर या मतदान केंद्रावर वीज गेल्याची घटना घडली. वारंवार येथील मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना तक्रार करूनही कोणतीही सुधारणा नाही.
मतदान यंत्रांमध्ये बिघाड आणि रांगा : मुंबईतील अनेक मतदान केंद्रांमध्ये मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याच्या घटना समोर आल्या. काही वेळानंतर मतदान यंत्रे पूर्ववत सुरू झाली. मात्र, दरम्यानचा काळात वेळ वाया गेला त्यामुळं मतदारांना ताटकळ थांबावं लागलं. मतदार मोठ्या प्रमाणात रांगेत उभे होते. विलेपार्ले आणि आरे या भागांमध्ये रांगा दूरवर गेल्या होत्या. त्यामुळं अनेक मतदार मतदान न करताच परत गेले. बिंबिसार येथील मतदान केंद्रावर सोयी सुविधांचा अभाव आहे, ज्येष्ठ नागरिकांना मतदान करण्यासाठी योग्य नियोजन केलं गेलं नव्हतं. त्यामुळं मतदारांना अनेक त्रास सहन करावा लागला आणि ताटकळत राहावं लागलं. त्यामुळं अनेक मतदार येऊन परत गेल्याचं अभिनेत्री अतिषा नाईक यांनी सांगितलं.
मतदान प्रक्रिया योग्यच: या संदर्भात सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर म्हणाले की, मतदान प्रक्रिया ही योग्य रीतीनं पार पडली. जे मतदार सहा वाजता रांगेत होते त्या सर्वांनचं आम्ही मतदान करून घेतलं आहे. उशिरापर्यंत मतदान चाललं तरीही ज्यांना स्लिप दिल्या त्यांचं मतदान आम्ही करून घेतलं आहे. अगदी आठ वाजेपर्यंत मतदान चाललं तरीही हरकत नाही अशा सूचना आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यांत्रिक बिघाडाबाबत ते म्हणाले की, काही ठिकाणी अशा पद्धतीच्या तक्रारी येतात आणि गेल्या चार टप्प्यांमध्ये ही विविध ठिकाणी अशा पद्धतीच्या तक्रारी आल्या आहेत. मात्र, या तक्रारी किरकोळ स्वरूपाच्या असतात. अगदी एक ते दोन टक्का इतक्याच प्रमाणात यांत्रिक बिघाड येतो. यामुळं खूप अडचण निर्माण झाली असं चित्र कुठेही नसल्याचं त्यांनी सांगितलं.
मतदानाची टक्केवारी वाढलेली :संथ गतीनं मतदान होण्यासंदर्भात विचारलं असता ते म्हणाले की, निवडणूक प्रक्रिया ही त्याच पद्धतीनं चालते. त्यामुळं ती संथ आहे असं म्हणता येणार नाही. काही ठिकाणी अधिकाऱ्यांची कार्यक्षमता कमी अधिक असू शकते. मात्र, त्यामुळं संत गतीनं मतदान झालं असं म्हणता येणार नाही. निवडणूक आयोगाकडून मतदार जागृती करण्यात आल्यामुळं उलट यावेळी मतदान चांगल्या पद्धतीनं झालं आहे. मतदानाची टक्केवारी गेल्या निवडणुकीपेक्षा वाढलेली पाहायला मिळेल. अंतिम आकडेवारी उद्या दुपारपर्यंत हाती येईल आणि 60 टक्क्यांच्या आसपास मतदान झाल्याचं आपल्याला दिसून येईल, असा दावाही पारकर यांनी केलाय.
हेही वाचा -
- संथ गतीच्या मतदानावरून फडणवीस-ठाकरे आमनेसामने, कमी मतदानानं वाढवली धाकधूक - Low Voting Issue Mumbai
- निवडणूक आयोगाकडून पक्षपातीपणा;उद्धव ठाकरेंचा आरोप, म्हणाले पहाटेचे 5 वाजले तरी मतदान करा - Lok Sabha Election 2024
- दक्षिण मुंबई मतदारसंघात मतदानाला प्रतिसाद आधी गरम नंतर नरम... - lok sabha election