सोलापूर Chandrakant Patil News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला नवं नाव आणि पक्ष चिन्ह दिलं. शरद पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार' असं नाव केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं. त्यानंतर आता शरद पवार गटाला 'तुतारीवाला माणूस' हे चिन्ह निवडणूक आयोगानं बहाल केलंय. या नवीन चिन्हाचं अनावरण रायगड किल्ल्यावर करण्यात आलं. मात्र, या चिन्हावरुन सत्ताधारी पक्षातील नेते टीका करत असल्याचं पहायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही शरद पवार गट आणि ठाकरे गटावर जोरदार टोलेबाजी केली आहे. तसंच "तुताऱ्या वाजवा, नाहीतर मशाली पेटवा, पण शेवटी महाराष्ट्रात आतापर्यंत आम्ही 45 म्हणत होतो, पण आता क्रॉस करू," असा दावा त्यांनी केलाय.
नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, "तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, पण शेवटी महाराष्ट्रात आतापर्यंत आम्ही 45 म्हणत होतो, पण आता क्रॉस करू", असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. तसंच "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढत चालली आहे. त्यांनी देशात लाभार्थी नावाचा गट निर्माण केलाय. याचं यश काही दिवसांपूर्वी झालेल्या मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील निवडणुकीत दिसून आलं," असंही ते म्हणाले.