महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

ऐन निवडणुकीत मनसेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता; उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल - PRASAD SANAP

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना, नाशिकमध्ये मनसेच्या एका उमेदवारावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Prasad Sanap
प्रसाद सानप (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 10, 2024, 4:42 PM IST

Updated : Nov 10, 2024, 5:42 PM IST

नाशिक : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. विधानसभा निवडणुकीचा निवडणूक खर्च का सादर केला नाही? या कारणावरून कुरापत काढून नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारानं आपल्या तीन साथीदारासह आडगाव शिवारातील मनसेच्या जिल्हा सचिवाच्या घरी जाऊन शिवीगाळ आणि दमदाटी केली, असा आरोप तक्रारदारानं केला.

लाखोंची केली चोरी : घरातील लॉकरमधून जबरदस्तीनं 9 लाख 59 हजार रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लुटून नेल्याचा आरोप तक्रारदारानं पोलीस तक्रारीत केला. याबाबत मनसेचे उमेदवार प्रसाद सानप यांच्यासह तीन संशयितांविरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

प्रतिक्रिया देताना तक्रारदार (Source : ETV Bharat Reporter)

रक्कम वापरण्यास दिला होता नकार : तक्रारदार योगेश नाना पाटील आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "सानप यांनी पाटील यांची महापालिका आणि विधानसभा निवडणूक आयोगाच्या परवानगीसाठी निवडणूक प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली होती. तसेच या कामाचा मोबदला म्हणून पाटील यांना काही रक्कम देण्यात आली होती. दरम्यान, सानप यांनी पाटील यांना 'तुला मोबदला म्हणून दिलेली रक्कम मनपा परवानगीसाठी वापर, आपण तुझ्या मोबदल्याचं नंतर बघू' असं सांगितलं. त्यावर पाटील यांनी सदर रक्कम वापरण्यास नकार देऊन 'मला तुमचं काम करता येणार नाही. तुमचे पैसे परत देतो' असं सांगितलं आणि ते निवडणूक खर्च सादर करण्यासाठी गेले नाहीत."

घरात घुसून चोरी : "या घटनेचा राग आल्यानं शुक्रवारी (8 नोव्हेंबर) रात्री दहा वाजेच्या सुमारास संशयित प्रसाद सानप आणि त्यांचे साथीदार उमाकांत एगडे, संकेत मोहिते आणि नितीन घुगे असे चौघेजण पाटील याच्या घरी गेले होते. त्यावेळी संशयितांनी पाटील यांना धमकी देत तू निवडणूक खर्च देण्यासाठी का गेला नाही, असं म्हणत आताच्या आत्ता पैसे दे, अशी मागणी केली होती. त्यावेळी पाटील यांनी पैसे देण्यासाठी वरच्या मजल्यावर असलेले लॉकर उघडले असता, संशयितांनी लॉकरमधील 8 लाख 84 हजार रुपयांची रोकड आणि 75 हजार रुपये किंमतीचे दागिने असा एकूण 9 लाख 59 हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांनी बळजबरीनं हिसकावून घेतला होता," असा आरोप तक्रारदारानं पोलीस तक्रारीत केला.

अशी दिली धमकी : "सानप यांनी आम्ही गिरीष महाजन यांना नडू शकतो तर तू कोण आहेस? असं म्हणत तुझ्या बहिणीच्या घरी गोंधळ घालण्यासाठी उद्या मुले पाठवतो अशी धमकी दिली. त्याचबरोबर घरातील आधार कार्ड, पॅन कार्ड आणि डेबिट कार्ड घेऊन निघून गेले. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे," अशी माहिती तक्रारदारानं दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मयूर निकम तपास करत आहेत.

दरम्यान, याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी उमेदवार प्रसाद सानप हे पत्रकार परिषद घेणार आहेत.

हेही वाचा -

  1. ऐन प्रचारावेळी आमदाराच्या मुलाचं अपहरण; नग्न व्हिडिओ काढल्याचा आरोप
  2. इथं माझीच दहशत कायम राहणार : सुहास कांदेंची अजित पवारांच्या समन्वयकाला शिवीगाळ
  3. मला जीवे मारण्याचा पूर्वनियोजित कट, लक्ष्मण हाके यांचा आरोप; म्हणाले "मद्यपान केल्याचा पुरावा दाखवा" - Laxman Hake Allegations
Last Updated : Nov 10, 2024, 5:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details