नागपूर/मुंबई :विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी (18 नोव्हेंबर) प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनी शक्ती पणाला लावली. मतदारांच्या भेटीगाठी घेण्याकरीता कुणी पदयात्रेवर भर दिला, तर कुणी मिरवणुकीच्या माध्यमातून प्रचार केला. शेवटच्या दिवशी सर्वच विशेषतः मोठ्या राजकीय पक्षाचे उमेदवार पायाला भिंगरी बांधल्यासारखं फिरताना दिसत होते. घड्याळात सहाचा ठोका पडताचं प्रचारतोफा थंडावल्या असल्या तरी आता खऱ्या अर्थानं छुप्या बैठका सुरू होणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
दिग्गज नेते प्रचारात सहभागी : मुंबईसह, पुणे, बारामती, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, परळी, आष्टी, अमरावती, बडनेरा, अकोला, नाशिक, धुळे, यवतमाळ या हाय प्रोफाईल मतदारसंघातील उमेदवारांनी शेवटच्या दिवशी जोरदार प्रचार केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध ठिकाणी सभा घेत महाविकास आघाडीवर टीका केली. तसंच शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात, अमोल कोल्हे या दिग्गज नेत्यांनी सभा घेत महायुतीवर हल्लाबोल केला.
बँडबाजा, ढोलताशे वाजवत प्रचार : नागपूर शहर क्षेत्रात 6 आणि रामटेक लोकसभा क्षेत्रात 6 असे एकूण 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. सर्व मतदारसंघात बंडखोरी झाल्यानं महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांचं टेंशन वाढलं असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत निवडून येण्यासाठी सर्वच उमेदवारांनी जास्त मेहनत घेतल्याचं दिसून आलं. मतदारांचं लक्ष वेधण्यासाठी उमेदवार बँडबाजा, ढोलताशे वाजवित फिरत होते, तर काहींनी बाईक रॅलीच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरल्याचं दिसत होतं. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी घरी जाऊन मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेण्यावर प्रत्येकाचा भर होता.
दक्षिण-पश्चिम नागपुरचा प्रचार :दक्षिण-पश्चिमचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रफुल्ल विनोद गुडधे यांनी सोनेगाव येथून बाईक रॅली काढली. बाईक रॅलीद्वारे मतदारसंघात फिरून मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. 2014 मध्ये ते प्रफुल्ल गुडधे एवढंच नाव वापरत होते. मात्र, यावेळी मतदारांना साद घालण्यासाठी वडीलांचं नाव जोडत होते. त्यांचे प्रतिस्पर्धी उपमुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार देवेंद्र फडणवीस यांच्यावर संपूर्ण राज्याची जबाबदारी असल्यानं भाजपा नेते आणि त्यांचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांना साद घालत होते.
राऊतांच्या मदतीला चिमुकली नात : उत्तर मध्य नागपूर येथील काँग्रेसचे उमेदवार नितीन राऊत आपल्या चिमुकल्या नातीला सोबत घेऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत होते. नातीला सोबत घेऊन त्यांनी मतदारांना भावनिक साद घातली. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपा उमेदवार मिलिंद माने यांनीही मतदारांच्या भेटी घेतल्या.