मुंबई Kripashankar Singh OnAyodhya Ram Mandir Inauguration: अयोध्येत श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठा उत्साहात संपन्न झाला आहे. श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना विधी पार पडताच मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले होते. 'जय श्रीराम' अशा घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला. यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करून आणि मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला.
राम भजनात तल्लीन : या ठिकाणी सकाळपासूनच श्री राम भजने सुरू आहेत. या भजनांच्या आणि गीतांच्या तालावर महिला कार्यकर्त्यांनी नृत्य सादर केलं. यावेळी विधी पार पडताच माजी आमदार राजपुरोहित, भाजपा नेते विश्वास पाठक, माजी मंत्री कृपाशंकर सिंग यांनी स्क्रीन समोर उभे राहून पूजा केली. तर कृपाशंकर सिंग यांनी दिवे लावून आनंद व्यक्त साजरा केला.
दर्शनासाठी मन साफ असावे लागते :यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंग म्हणाले की, राहुल गांधी यांनी अयोध्या दर्शनाचं निमंत्रण नाकारून आपल्या मनोवृत्तीचं दर्शन घडवलं आहे. ज्यांना प्रभू रामाचं दर्शन घ्यायचं असतं त्यांना ते सहज मिळत. मात्र यांची यापुढे इच्छा जरी असली तरी त्यांना दर्शन मिळणार नाही. कारण त्यांचं मन साफ नाही. आधी त्यांनी आपलं मन स्वच्छ करावं असा टोला, कृपाशंकर सिंग यांनी यावेळी लगावला.
हिंदुत्ववादी संघटना तर्फे शोभायात्रा : आज सकाळपासूनच गिरगाव वरळी या भागात विश्व हिंदू परिषद आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं शोभायात्रा काढण्यात आली. प्रभू रामचंद्राची पालखी आणि हनुमान आणि श्री रामाच्या वेशभूषेत लहान मुले शोभायात्रेत सहभागी झाली होते. तर तरुण मुलांनी शोभायात्रेत लेझीम सादर केलं. त्याचबरोबर महिलाही मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाल्या होत्या. श्री रामाची भजने गायली जात होती. एकूणच श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त मुंबईत सर्वत्र उत्साह आणि आनंद पाहायला मिळला.
हेही वाचा -
- सोलापूरच्या चित्रकाराची अनोखी रामभक्ती; रक्ताने साकारली प्रभू श्री रामांची प्रतिमा
- राम लल्ला हे शांती, संयम, समन्वयाचे प्रतीक : पंतप्रधान नरेंद्र मोदी
- श्रीरामाचा तंबूतला 500 वर्षाचा वनवास संपला, भव्यदिव्य मंदिरात विराजमान : पंतप्रधान नरेंद्र मोदी