वाशिम : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय माजी आमदार दिवंगत राजेंद्र पाटणी यांचे पुत्र ज्ञायक पाटणी यांनी, थेट शरद पवारांची भेट घेऊन हाती तुतारी घेतलीय. शनिवारी रात्री ज्ञायक पाटणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस एसपी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय. यावेळी शरद पवार यांनी त्यांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. यामुळं कारंजा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापलंय.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत केला पक्षप्रवेश : वाशिम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघ राजकीय दृष्टीनं महत्वाचा मानला जातो. येथून भाजपाचे राजेंद्र पाटणी प्रतिनिधित्व करीत होते. परंतु त्यांचं निधन झाल्यामुळं २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक होते. राजेंद्र पाटणी यांचे पुत्र ज्ञायक पाटणी यांनी भाजपाकडं उमेदवारी मागितली होती. त्यासाठी त्यांनी येथून निवडणुकीची तयारी केली होती. परंतु अजित पवार गटातील सई डहाके यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतल्यानं त्यांची उमेदवारी येथून पक्की मानली जात असतानाच, ज्ञायक पाटणी यांनी तातडीने शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. मागील काही दिवसापासून ते तुतारीवर लढतील. अश्या चर्चा जिल्ह्यात रंगू लागल्या होत्या.
कारंजातील राजकीय समीकरणे चदलणार : कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी राजेंद्र पाटणी २००४ मध्ये शिवसेना पक्षाकडून निवडून आले होते. त्यानंतर २०१४ व २०१९ मध्ये त्यांनी भाजपचा गड राखला होता. २००९ मध्ये राष्ट्रवादीकडून दिवगंत प्रकाश डहाके विजयी झाले होते. प्रकाश डहाके यांच्या पत्नी अजित पवार गटात होत्या. त्या बाजार समितीच्या सभापती आहेत. तर दिवंगत आमदार पाटणी यांनी देखील मतदारसंघावर पकड निर्माण केली होती. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार आणि त्यांचा पक्ष बदलल्यामुळं राजकीय समीकरणे बदलली आहेत. आता येथून भाजपाकडून सई डहाके तर शरद पवार पक्षाकडून ज्ञायक पाटणी हे उमेदवार राहतील. हा मतदारसंघ बंजारा बहुल मतदारसंघ आहे. येथून वंचितने बंजारा उमेदवार रिंगणात उतरविला आहे. त्यामुळं चुरस वाढणार आहे.