सिंधुदुर्ग Sawantwadi Constituency : कोकणातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरुन महायुतीमध्ये वाद सुरू आहे. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी येत्या विधानसभा निवडणुकीसाठी दावा केला आहे. याला शिवसेनेचे मंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
कार्यकर्तांना उद्देशून लिहिलं पत्र : लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्गात भाजपाला मिळालेल्या यशानंतर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघावर आता भाजपानं दावा केल्याचं पाहायला मिळतय. भाजपाचे माजी आमदार आणि सावंतवाडी मतदारसंघाचे विधानसभा प्रमुख राजन तेली यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून भावनिक पत्र लिहलं असून या पत्रातून त्यांनी शिवसेना आमदार तथा राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना आव्हान दिलं आहे. 15 वर्षांपासून दीपक केसरकर या मतदारसंघाचे आमदार तर गेल्या 8 वर्षांपासून मंत्री असूनही या मतदारसंघात काही करु शकले नाहीत. विकास करण्यात दीपक केसरकर सपशेल अपयशी ठरले आहेत, असं म्हणत तेली यांनी थेट केसरकरांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. इतकंच नव्हे तर तेली यांनी सावंतवाडी मतदारसंघात भाजपाच्या कमळ निशाणीवर लढू या, असं थेट आवाहनच कार्यकर्त्यांना केलं आहे. विशेष म्हणजे राजन तेली यांनी दोनवेळा सावंतवाडी मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. त्यातच आता आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी विधानसभा भाजपाला मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी त्यांनी सावंतवाडी मतदारसंघावर भाजपाचं वर्चस्व कसं आहे आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांचं प्रत्येक निवडणुकीत मताधिक्य कसं कमी झालं, याकडं महायुतीच्या नेत्यांचं लक्ष वेधल्याचं पाहायला मिळतय.