पुणे : राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. काल (5 डिसेंबर) भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अशातच गेल्या काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता त्यांनी महायुतीत कुठलाही वाद नसल्याचं स्पष्ट केलं. "एकनाथ शिंदेंनी कालच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तसंच खाते वाटपाबाबत देखील आमच्यात कुठलाही वाद नाही," असं त्यांनी सांगितलं.
घटना बदलण्याचा विषयच नाही :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चंद्रकांत पाटील यांनी पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी ते बोलत होते. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले विचार हे अधिकाधिक मजबूत झालं पाहिजे. त्यांचे विचार घेऊन आपण पुढे गेलो पाहिजे. तसंच पुढील हजार वर्षाचा मानवी मनाचा अभ्यास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली असून ती बदलण्याचा विषयच येत नाही," असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
प्रसार माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील (Source - ETV Bharat Reporter) फोन करून शपथविधीचं निमंत्रण दिलं होतं : आम्हाला शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण मिळालं नसल्याचं काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटलं आहे. यावर पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले, "हा शपथविधी बंदिस्त खोलीत नव्हता. नाना पटोले यांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे तसंच नाना पटोले यांना फोन करून निमंत्रण दिलं होतं. निमंत्रण न देण्याचा कुठलाही विषय नाही. कारण हा शपथविधी जनतेचा होता." पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबतही त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. "पालकमंत्री पदाबाबत माझे पक्षश्रेष्ठी जे सांगतील तो निर्णय मान्य असेल," असं ते म्हणाले.
पोलिसांकडून कडक कारवाई होणार : पुणे शहरात तीन दिवसांत पाच खुनाच्या घटना घडल्या आहेत. याबाबत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले, "जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असेल, तर प्रशासन त्याचा शोध घेण्यासाठी सक्षम आहे. पुणे पोलीस खूप अलर्ट असून पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार."
हेही वाचा
- कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष; जाणून घ्या, त्यांची राजकीय कारकिर्द
- राज्यसभेत काँग्रेस खासदाराच्या सिटखाली नोटांचं बंडल; चौकशीचे आदेश
- 'वो मोसम अब बदल चुका है'; देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांचं वक्तव्य चर्चेत