मुंबई/पालघर Lok Sabha Election 2024 : पालघर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपानं हेमंत विष्णू सावरा यांना तिकीट दिलंय. ते भाजपाचे दिवंगत नेते विष्णु सावरा यांचे पुत्र आहेत. पालघरच्या जागेचा मुद्दा भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात अडकला होता. अखेर ही जागा आपल्याकडं आणण्यात भाजपाला यश आलंय. मोठी बाब म्हणजे या जागेवरुन शिंदे गटाचे राजेंद्र गावित हे विद्यमान खासदार आहेत. त्यांचा पत्ता कट करण्यात आलाय.
महायुतीत सुरू होती रस्सीखेच : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून पालघर जागेच्या वाटणीमध्ये महायुतीमध्ये चढाओढ सुरू होती. ठाण्याची जागा शिवसेनेकडं गेली होती. त्यानंतर पालघरचा उमेदवार भाजपा ठरवेल हे जवळपास निश्चित झालं होतं. निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांमध्ये विशेष स्पर्धा नसताना देखील महायुतीतर्फे पालघर लोकसभेची उमेदवारी सर्वात अखेरीस घोषित करण्यात आली.