प्रतिक्रिया देताना खासदार नवनीत राणा अमरावती Lok Sabha Elections: लोकसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं आहे. देशभरात येत्या 19 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील विविध पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. आता महायुतीकडून अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या अधिकृत उमेदवार म्हणून खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नवनीत राणा यांच्या हाती कमळ हे चिन्ह येताच राजकमल चौकासह त्यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीसह ढोल, ताशे वाजवून जल्लोष केला.
अमरावतीकरांच्या आशीर्वादाने मिळाली उमेदवारी: खासदार म्हणून पाच वर्षात अमरावती जिल्ह्यात जे काही विकास कामं केली आहे त्याची नक्की जाण अमरावतीकरांना आहे. अमरावतीकरांचा मला आशीर्वाद असल्यामुळं भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मला मिळाली असल्याचं खासदार नवनीत राणा यांनी म्हटलंय.
सर्वांना सोबत राहण्याचे आवाहन : पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा तसंच भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मी आज खऱ्या अर्थाने आभार मानते. भाजपाची एक साधी कार्यकर्ता म्हणून मी या निवडणूक रिंगणात उतरत आहे. भाजपातील सर्व नेते तसंच महायुतीतील सर्व पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयासाठी माझ्यासोबत राहावं, असं आवाहन नवनीत राणा यांनी केलंय.
पंतप्रधानांची घेणार भेट : खासदार नवनीत राणा या बुधवारी रात्री शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीसाठी नागपूरला रवाना होत आहेत. गुरुवारी मुंबईला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याचं देखील खासदार नवनीत राणा यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- महाविकास आघाडीकडून बुलढाणा लोकसभेसाठी नरेंद्र खेडेकर निवडणुकीच्या रिंगणात; चार एप्रिलला भरणार अर्ज - lok Sabha Elections
- महाविकास आघाडी राहिली 'वंचित', प्रकाश आंबेडकर यांनी ८ जागांवरील उमेदवारांची केली घोषणा - Prakash Ambedkar news
- "शिंदे गटाचे मला रोज फोन, पण...", अंबादास दानवे यांचा गौप्यस्फोट; चंद्रकांत खैरेंच्या उमेदवारीवरुनही केलं भाष्य - Ambadas Danve