पाटणा Bihar Politics :पंतप्रधान मोदींविरोधात देशभरातील भाजपाविरोधी पक्षांना एकत्र करणारे आणि 'इंडिया' आघाडीचे शिल्पकार असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा एनडीएकडे झुकताना दिसतायेत. नितीश कुमार यांच्यावर दबावाचं राजकारण केल्याचा आरोप आहे. यावेळी नितीश यांच्या राजकारणानं आणखी एक पातळी ओलांडली.
बिहारमध्ये मोठा 'गेम' होणार? : दबावाच्या राजकारणाद्वारे आपली मागणी पूर्ण करवून घेण्यात नितीश कुमार माहिर आहेत. सध्या बिहारमधील राजकीय गदारोळामुळे, त्यांना जे साध्य करायचं होतं ते साध्य झाल्याचं दिसतंय. अशा स्थितीत, महाआघाडीतील दोन प्रमुख पक्ष आरजेडी आणि जेडीयूमधील भांडणंही चव्हाट्यावर आलीत. जदयू नेते मनोज झा यांनी नितीश कुमारांकडे स्थिती स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.
येथून राजकीय वातावरण बदललं : कर्पूरी ठाकूर यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त नितीश कुमार यांनी कुटुंबवादाचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर एनडीएच्या अनेक नेत्यांनी हा मुद्दा जोरात मांडण्यास सुरुवात केली. घराणेशाहीबाबत भाजपा लालू, काँग्रेस तसेच सपाला सतत टोलावत असतो.
बिहार विधानसभेची सद्यस्थिती :2020 च्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं. मात्र 7 ऑगस्ट 2022 रोजी नितीश कुमार यांनी राजीनामा दिला आणि आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षांसोबत सरकार स्थापन केलं. महाआघाडीला 160 आमदारांचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे कोणतीही अडचण आली नाही. यावेळी नितीश कुमार यांनी पुन्हा पक्ष बदलून एनडीएसोबत सरकार स्थापन केलं तरी बहुमताचा आकडा फार वाढणार नाही.
2020 च्या विधानसभा निवडणुकीनंतर गणित बदललं : बिहारमध्ये सध्या आरजेडीचे 79 आमदार आहेत. तर जेडीयूचे 45, काँग्रेसचे 19 आणि डाव्या पक्षांचे 16 आमदार आहेत. जेडीयूला एका अपक्ष आमदाराचाही पाठिंबा आहे. म्हणजेच सध्या एकूण 160 आमदार महाआघाडीसोबत आहेत. यासोबतच एआयएमआयएमचा एक आमदारही त्यांच्यासोबत आहे. तसं पाहिलं तर, एआयएमआयएमचे पाच आमदार विजयी झाले होते. परंतु त्यापैकी चार आरजेडीमध्ये सामील झाले. त्यामुळे आता केवळ एक आमदार एआयएमआयएमकडे उरला आहे.