बारामती Baramati Lok Sabha Constituency : शरद पवार यांच्यापासून फारकत घेत महायुतीत दाखल झालेल्या अजित पवार यांच्याकडे पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर बारामती लोकसभा निवडणूक चुरशीची होणार असल्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढणार असल्याचं निश्चित झालंय. याबाबतची अधिकृत घोषणा शनिवारी करण्यात आली.
नणंद विरुद्ध भावजय : महायुतीत भाजपासह शिवसेना शिंदे गटाची अजित पवार यांना लोकसभा निवडणुकीत मोठी साथ आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे या उमेदवार आहेत. बारामतीच्या या निवडणूकीत शरद पवार व अजित पवार यांचा राजकीय कस लागणार आहे. गेली तीन टर्म सुप्रिया सुळे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. आता बदललेल्या राजकीय स्थितीत त्यांच्यापुढं घरातूनच भावजय सुनेत्रा पवार यांच्या रुपात बलाढ्य आव्हान उभं राहिलंय. बारामती शहर व तालुक्यात अजित पवार यांचा एकहाती अंमल आहे. गत निवडणुकीत बारामतीच्या जोरावरच सुळे विजयी झाल्या होत्या. यंदा त्यांना इथं मोठी मेहनत घ्यावी लागेल.
बारामतीतील विधानसभेत कोणाची ताकद : इंदापूरमध्ये अजित पवार यांना भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांची मदत घ्यावी लागेल. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे राष्ट्रवादीचेच आहेत. ते अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळं हे दोन बडे नेते एकत्र असतील तर इंदापुरात सुनेत्रा पवार यांना फारशी अडचण येणार नाही. दौंडमध्येही तीच परिस्थिती आहे. तेथील आमदार राहुल कुल हे भाजपाचे आहेत. त्यांच्या पत्नी कांचन कुल यांचा गत निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी पराभव केला होता, ती सल त्यांच्या मनात असेल. तेथील राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतील नेते रमेश थोरात व अन्य मंडळी अजित पवार यांच्या जवळची आहेत. त्यामुळं दौंडमध्ये महायुतीचं पारडं जड राहील. शरदचंद्र पवार गट व महाविकास आघाडीची दौंडमध्ये फारशी ताकद नाही.
बारामतीतून सुप्रिया सुळेंची हॅटट्रिक : शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून यापूर्वी अनेकदा विजयी झाले आहेत. त्यांनंतर त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे देखील 2009, 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत या मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. मात्र, यंदा राष्ट्रवादीचा एकनिष्ठ मतदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्या निष्ठावंतांमध्ये विभागला जाईल. बारामती विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार अजित पवारांनीच गेल्या निवडणुकीत सुळे यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पवारांच्या मतपेढीवर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घेतली. त्यामुळं 2019 च्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी बारामती मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून विजय मिळवून हॅटट्रिक केली.