प्रतिक्रिया देताना केशव उपाध्ये (Mumbai Reporter) मुंबई Lok Sabha Election 2024
: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान करण्यासाठी भाजपा सज्ज आहे. पाच शतकांपासून रखडलेला राम मंदिराचा मुद्दा मार्गी लावण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यश आलंय. म्हणूनच १८ व्या लोकसभा निवडणुकीत भाजपासाठी इतर अनेक मुद्द्यांसह प्रचारात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राम मंदिर आहे. या मुद्द्यावरून भाजपाने अनेक राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात राम मंदिर : राजकीय विश्लेषकांच्या मते इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या राजकारणात राम मंदिर आणि हिंदूत्व हा मुद्दा टिकवून ठेवणं भाजपाला तितकं शक्य झालं नाही. बाबरी पाडली त्याचं यश कोणाचं? यावरून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजपामध्ये अनेकदा जुंपली आहे. बाबरी पाडली तेव्हा शिवसैनिक कुठे होते? तर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली त्याचा मला अभिमान आहे, हे बाळासाहेब ठाकरे यांचं वक्तव्य, असे अनेक विवादीत आरोप प्रत्यारोप महाराष्ट्राच्या राजकारणात झाले. परंतु देशात अनेक ठिकाणी भाजपा हा मुद्दा प्रखरतेनं गाजवत आहे.
लोकसभाचे फुंकले रणशिंग : अयोध्येत २२ जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा करून भाजपानं या सोहळ्यातून अठराव्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकलं होतं. या सोहळ्याला काँग्रेस नेते सोनिया गांधी, राहुल गांधी, इंडिया आघाडीचे नेते, उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिल्याचा मुद्दा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा पहिल्या तीन टप्प्याच्या प्रचारात काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. काँग्रेस हिंदुत्व विरोधी तसेच मुस्लिमांचे लांगुलचालन करणारी आहे, अशी टीका भाजपाकडून होत आहे. जालनामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तर काँग्रेसची सत्ता आल्यास ते बाबरीच कुलूप राम मंदिराला लावतील असा थेट घणाघात केला होता. तर त्याला प्रत्युत्तर देताना देशात काँग्रेसची सत्ता आल्यास राम मंदिराचे शुद्धीकरण केलं जाईल, अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली.
हिंदूत्व आणि राम मंदिर हे मुद्दे : कोणत्या ना कोणत्या कारणावरून या निवडणुकीच्या प्रचारात राम मंदिर चर्चेत राहिलं पाहिजे ही भाजपाची रणनीती आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर देशभरातील जास्तीत जास्त जनतेला अयोध्येला दर्शनासाठी नेण्याची तयारी भाजपानं अद्याप सुरू ठेवली. इतकेच नाही तर भाजपाच्या प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघातील काही प्रभावशाली व्यक्तींना राम मंदिराचं महत्त्व पटवून देण्याचं काम हाती दिल. तसेच निवडणुकीत हिंदूत्व आणि राम मंदिर हे मुद्दे भाजपानं प्रचारात केंद्रस्थानी ठेवले. राम मंदिर मुद्द्याचा फायदा निवडणुकीत प्रचारादरम्यान कसा होईल याचा सखोल अभ्यास भाजपा नेतृत्वानं केला असून त्या पद्धतीची रणनीती त्यांनी आखली आहे. देशात उरलेल्या निवडणुकीच्या चार टप्प्यात या मुद्द्याचा अधिका अधिक फायदा करून घ्यायचा भाजपाचा मनसुबा आहे.
काँग्रेसची अत्यंत घातक भूमिका : नाना पटोले यांनी राम मंदिर शुद्धीकरणाच्या केलेल्या वक्तव्यावर बोलताना भाजपा राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, ज्या रामाबद्दल तुम्हाला विश्वास नव्हता. राम हे काल्पनिक पात्र आहे, अशा पद्धतीची भाषा काँग्रेसने अधिकृतपणे आपल्या प्रतिज्ञापत्रकात केली होती. तोच काँग्रेस पक्ष आज अशा पद्धतीने राम मंदिर शुद्धीकरणाची भाषा करते आहे. याचाच अर्थ समाजामध्ये दुही माजवायची वर्णवादी व्यवस्था आम्ही मानतो अशा पद्धतीची नाना पटोले यांची भाषा आहे. मोदी हे खालच्या जमातीचे आणि काँग्रेसची लोक ही उच्चवर्णीय आहेत, अशा पद्धतीने बोलण्याची ही मानसिकता आहे. म्हणून काँग्रेसचं हे धोरण आहे आणि हीच मानसिकता लोकं हाणून पाडतील. राम मंदिराचं शुद्धीकरण करावं ही सर्वात मोठी काँग्रेसची घातक भूमिका आहे. सोनिया गांधी यांनी मोदी यांना 'मौत का सौदागर' म्हटलं होतं. मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा अशा पद्धतीची भाषा केली होती. आता नाना पटोले शुद्धीकरणाची भाषा करत आहेत. म्हणजे स्वतःबद्दल असलेली उच्चवर्णीय भावना आणि मोदी यांच्याबद्दल असलेली खालच्या थराची भावना यातून स्पष्ट होते.
राम मंदिर मुद्द्याचा तितका फायदा नाही : याबाबत बोलताना राजकीय विश्लेषक जयंत माइंकर म्हणाले आहेत की, वास्तविक राम मंदिर मुद्दा हा आता संपलेला आहे. परंतु भाजपा मोठ्या प्रमाणामध्ये शेवटच्या टप्प्यात ज्याला काऊ बेल्ट असं म्हटलं जातं. जिथे गो हत्या, राम मंदिर असे मुद्दे चालतात तिथे हा मुद्दा मोठ्या प्रमाणामध्ये गाजवणार. उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश या संपूर्ण नॉर्थ बेल्टमध्ये तसेच गुजरातमध्ये भाजपा मजबूत असून इथे या मुद्द्यांचा फायदा भाजपाला होणार आहे. परंतु ज्या पद्धतीनं भाजपाच्या भावनिक रणनीतीमध्ये काँग्रेस अडकली जात आहे, तर त्यांना त्यापासून दूर राहायला हवं. आमची सत्ता आली तर आम्ही राम मंदिराचं शुद्धीकरण करणार असं वक्तव्य नाना पटोले यांनी न केलेलं बरं होतं.
ठराविक ठिकाणी राम मंदिर मुद्दा रहिला आहे : ज्या पद्धतीने सॅम पित्रोदा वक्तव्य करत आहेत त्यामुळं काँग्रेसला अजून अडचणीत आणण्याचं काम होत आहे. राहुल गांधी यांनी सुद्धा सोमनाथ मंदिराला भेट देण्यापासून लांब राहायला हवं होतं. वास्तविक भाजपाची स्ट्रॅटेजीच आहे की, त्यांना हवे तसे राजकीय पेच ते स्वतः तयार करतात आणि त्यांना हवी तशी बॉलिंग बॅटिंग ते करून घेतात. राम मंदिर मुद्द्याचा भाजपला या निवडणुकीमध्ये मोठा फायदा होईल असं चित्र होतं, परंतु आताच्या घडीला राम मंदिर हा मुद्दा काही ठराविक ठिकाणी मर्यादित असून इतरत्र तो संपलेला आहे असंही माईंकर म्हणाले.
हेही वाचा -
- "2016 मध्येच भाजपाबरोबर जाणार होतो, पण..."; 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सुनील तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट - Sunil Tatkare Exclusive
- मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी निवडणूक प्रचारात; "ठाकरेंची ‘मशाल‘ दहशतवाद्यांच्या हाती" - Lok Sabha Election 2024
- मोदी-शाहांमुळं शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळालं, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? - CM Eknath Shinde Shivsena