मुंबई Sanjay Raut Defamation Case : मीरा-भाईंदर येथे सार्वजनिक शौचालय बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचं खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हणत किरीट सोमैया आणि मेधा सोमैया यांच्यावर आरोप केले होते. या विरोधात सोमैया कुटुंबानं अब्रू नुकसानीचा दावा संजय राऊत यांच्यावर ठोकला होता. संजय राऊतांना न्यायालयानं 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यानंतर आज माझगाव कोर्टात संजय राऊत उपस्थित राहिले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकार आणि न्यायव्यवस्थेवर जोरदार हल्लाबोल केला.
किरीट सोमैया यांचा गंभीर आरोप : तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारच्या दबावाखाली पोलिसांनी संजय राऊत यांच्याविरोधात पत्नीची तक्रार स्वीकारण्यास नकार दिल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केला.
अब्रुनुकसानीचा संबंध येतो कुठे? :भाजपाच्या नेत्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी काही भ्रष्टाचार केला तरी चालते. पण आम्ही खरे बोललो की, आमच्या विरोधात गुन्हा दाखल केला जातो. शिक्षा सुनावली जाते. मिरा-भाईंदर शौचालय बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचं मीरा-भाईंदरचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी म्हटलं. त्या विभागाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहून यांच्या चौकशीची मागणी केली होती. त्यावेळी विधान भवनात यावर चर्चा झाली. त्याची चौकशी रितसर व्हावी, असे आदेश देण्यात आले. पण यात मी काही प्रश्न उपस्थित केले. जर गडबड असेल तर चौकशी व्हावी असं म्हटलं, मग यात अब्रुनुकसानीचा संबंध येतो कुठे? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय.
सेशन कोर्टात धाव घेणार: पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, "जर मी काही प्रश्न विचारले किंवा सवाल उपस्थित केला तर माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यात आला. हे अत्यंत चुकीचं आहे. मी आज कोर्टात आलो. काही पुरावे सादर केले आहेत. पण कोर्टानं पुरावे अमान्य केले. आता या विरोधात आम्ही सत्र न्यायालयात जाऊ. माझ्याकडं सर्व पुरावे आहेत. आम्ही जनतेत जाऊ आणि जनतेला सांगू सत्य काय आहे. कारण आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. परंतु, न्यायव्यवस्थेकडून ते होत नाही. माझ्यावर अन्याय होत आहे. सार्वजनिक बांधकामात भ्रष्टाचार होतोय. जनतेच्या पैशाचा गैरवापर होतोय. याबाबत आम्ही जर काही प्रश्न उपस्थित केले तर, आम्हाला दोषी ठरवलं जातय. हे अत्यंत गंभीर आहे. मीरा-भाईंदर पालिकेच्या अहवालात सुद्धा या शौचालयाच्या बांधकामात घोटाळा झाल्याचं म्हटलय. परंतु, हे सर्व असताना मी काही प्रश्न विचारल्यानंतर मला 15 दिवसाची शिक्षा सुनावली. पण आम्ही शांत बसणार नाही. आम्ही जिल्हा न्यायालयात जाऊ आणि न्याय मागू, मी कोणताही गुन्हा केला नाही".
... त्या देशात न्याय काय मिळणार? : "या देशात वरपासून खालपर्यंत सर्वत्र न्यायालयाचं संघीकरण झालं आहे. ज्या देशात सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या घरी देशाचे पंतप्रधान हे मोदक आणि लाडू खाण्यासाठी, आरती ओवाळण्यासाठी जातात. अशा देशात आम्हाला न्याय काय मिळणार?", असं संतप्त सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. या देशाची न्यायव्यवस्था रXX झाली आहे. असं शाहीर आण्णाभाऊ साठे यांनी म्हटलंय, मी नाही म्हणत आहे. त्यामुळं आजची परिस्थिती ही फार वेगळी नाही. मी सत्य मुद्दे मांडले त्यामुळं भाजपाच्या लोकांना झोबलं. मी काय गुन्हा केलेला नाही. मी काही सवाल उपस्थित केले आणि मला जर इथे न्याय नाही मिळाला तर आम्ही वरच्या कोर्टात जाऊ, आम्ही लढत राहू. जो मुलुंडचा ना** पोपट आहे तो अनेकांवर आरोप करतो. त्यानं अब्रुनुकसान होत नाही आणि आम्ही सवाल उपस्थित केले तर अब्रुनुकसान कसं काय होऊ शकतं? असा सवाल राऊत यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीत अटकेचा प्रयत्न: या कामात घोटाळा झालाय असं विरोधीपक्ष नेते, आमदार, खासदार सगळ्यांनी म्हटलय. परंतु, आता फासावर कोणाला लटकवलं जात आहे तर संजय राऊतांना. विधानसभा निवडणुकीच्या आधी मला हा अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गंभीर आरोप राऊतांनी सरकारवर केला. लोकसभा निवडणुकीच्या आधी राहुल गांधी यांना फासावर लटकवण्याचा प्रयत्न केला गेला. जनतेच्या पैशाचा गैरवपार होतोय असं म्हटल्यावर हे सवाल विचारणाऱ्यांना अटकेची भीती दाखवत आहेत, असं राऊत म्हणाले.
हेही वाचा -
- बलात्काराच्या आरोपात भाजपाच्या पदाधिकाऱ्याला अटक; देवेंद्र फडणवीस एन्काऊंटर करणार का ? संजय राऊतांचा 'रोखठोक' सवाल - Sanjay Raut On Akshay Shinde
- अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी, न्यायालयाकडून 15 दिवस तुरुंगवासाची शिक्षा - Sanjay Raut
- मनमाडची लढाई ही गद्दार विरुद्ध खुद्दार, पिसाळलेल्या हत्तीला लगाम घालणार ; खासदार संजय राऊत यांचा हल्लाबोल - Sanjay Raut On Pm Modi