महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

"प्रचाराच्या पोस्टरवरुन माझा फोटो काढा अन्यथा...", नवनीत राणांविरोधात महायुतीतील अजून एक नेता आक्रमक - Amravati Lok Sabha Constituency - AMRAVATI LOK SABHA CONSTITUENCY

Amravati Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अमरावतीत महायुतीची डोकेदुखी अजून वाढण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून भाजपानं नवनीत राणा यांना तिकीट दिलं आहे. यावरुन प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी विरोधाची भूमिका घेतली असतानाच आता महायुतीमधील अजून एका मित्रपक्षाच्या नेत्यानं नवनीत राणांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

Amravati Lok Sabha Constituency Sanjay Khodke objects to use of his photo in Navneet Rana campaign posters
महायुती उमेदवार नवनीत राणा

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 31, 2024, 9:05 PM IST

अमरावती Amravati Lok Sabha Constituency : भारतीय जनता पार्टीनं अमरावतीतून खासदार नवनीत राणा यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारीला महायुतीचा घटक पक्ष असलेल्या प्रहारकडून विरोध करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय. असं असतानाच आता महायुतीतील घटक असणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांनी देखील राणांविरुद्ध आपली नाराजी जाहीर केली आहे. त्यामुळं अमरावतीत महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नाराजीचं कारण काय? :अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांनी आपल्या प्रचाराच्या पोस्टरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांचा फोटो लावल्यामुळं आता नवा वाद उफाळून आला आहे. प्रचाराच्या पोस्टरवरुन माझा फोटो काढा अन्यथा मला तुमच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा थेट इशाराच संजय खोडके यांनी नवनीत राणा यांना दिला आहे. तसंच "सोशल मीडियावर किंवा पोस्टरवर माझा फोटो लावण्याची मला काहीही कल्पना नसून माझा फोटो वापरण्याबाबत माझी वैयक्तिक अनुमती सुद्धा घेतली नाही. ही बाब निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारी आहे. लोकसभा निवडणुकीत माझ्या फोटोचा आणि नावाचा वापर करू नये. ज्या ठिकाणी माझ्या फोटोचा वापर झालाय, तेथून माझा फोटो त्वरित काढण्यात यावा. जर या संदर्भात माध्यमाद्वारे खुलासा केला नाही तर आपल्या विरोधात कायदेशीर कारवाई करणं मला भाग पडेल," असंही खोडके म्हणाले आहेत.

राणा आणि खोडकेतील वाद काय? : अमरावती जिल्ह्यात संजय खोडके आणि रवी राणा यांच्यातील वाद हा सर्वांनाच परिचित आहे. 2009 आणि 2014 मध्ये रवी राणा यांनी बडनेऱ्याच्या आमदार सुलभा खोडके यांचा पराभव करुन त्यांना मोठा धक्का दिला होता. तेव्हापासून राणा आणि खोडके यांच्यात वाद आहे. तसंच रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांना 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीत अधिकृत उमेदवारी दिली होती. यामुळं संजय खोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. यानंतर खोडके यांनी अमरावतीत वऱ्हाड विकास मंच नावाचा नवा पक्ष देखील स्थापन केला होता.

अगोदरच भूमिका स्पष्ट केली होती : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय खोडके यांनी सांगितलं की, "काही दिवसांपूर्वी राणा माझ्या भेटीला आले होते. त्याचवेळेस मी तुमचा प्रचार करणार नाही आणि तुमच्या विरोधातही कुठं बोलणार नाही, असं मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं. असं असताना देखील आता त्यांच्या प्रचारासाठी माझ्या फोटोचा वापर करणं चूकीचं आहे. आमचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत देखील या विषयावर मी स्पष्ट बोललोय."

हेही वाचा -

  1. अमरावतीचं पोस्टमार्टम झालंय, नवनीत राणांच्या उमेदवारीवरून बच्चू कडू यांची टीका - Bachu Kadu criticizes Navneet Rana
  2. महाविकास आघाडीच्या बळवंत वानखडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, जिंकण्याचा विश्वास - Amravati Lok Sabha
  3. भाजपाच्या 'लेटरहेड'वर मुख्यमंत्र्यांचे आदेश; न्यायालयानं ठरवलं बेकायदेशीर - CM Eknath Shinde Order

ABOUT THE AUTHOR

...view details