अमरावती Amravati Lok Sabha Constituency : महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या अमरावती लोकसभा मतदारसंघात आज (30 मार्च) महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे बळवंत वानखडे (Balwant Wankhade Nomination Filed) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव गटाचे पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते.
महाविकास आघाडीला विजयाचा आत्मविश्वास : अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या अमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी यावेळी निश्चितच विजयी होईल. तसंच आमचे सर्व मित्रपक्ष मिळून ही निवडणूक जिंकणार, असा विश्वास बळवंत वानखडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी शहरातील सर्व महामानवांच्या पुतळ्याला अभिवादन केलं असल्याचंही वानखडे यांनी सांगितलं. जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर, डॉ. सुनील देशमुख, शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते माजी खासदार अनंत गुढे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे, काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित होते.