छत्रपती संभाजीनगर Ambadas Danve : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच आता राज्यात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळणार असल्याची शक्यता निर्माण झालीय. शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी "दोन दिवसात राजकीय भूकंप होईल," असं विधान केलं असतानाच आता विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे शिंदेंच्या शिवसेना वाटेवर असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु झालीय. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी मिळणार असल्यानं नाराज झालेले अंबादास दानवे शिंदे गटात जाणार असल्याचं बोलल जातंय. मात्र यावर अद्याप दानवे यांच्याकडून प्रतिक्रिया प्राप्त झाली नाही.
नाराज दानवे जाणार शिंदे गटात ? :विधान परिषदेचे विरोधी पक्ष नते अंबादास दानवे एकनाथ शिंदे गटात जातील, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून अद्याप कोणालाही उमेदवारी जाहीर झाली नसली तरी, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी उमेदवार म्हणून आपल्या कामाला सुरुवात केलीय. मातोश्रीवरुन त्यांना तसेच संकेत मिळाल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात आलंय. या मतदारसंघात नवीन चेहरा हवा असा आग्रह अंबादास दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केला होता. मात्र त्याबाबत त्यांनी अद्याप निर्णय घेतला नाही, इतकंच नाही तर "खैरेंऐवजी मला लोकसभा लढू द्या," अशी मागणीही दानवे यांनी पक्षाकडे केली होती. मात्र निवडणुकीच्या काळात राज्यभर प्रचार करण्यासाठी दानवे यांच्यासारखा नेता आवश्यक आहे. त्यामुळं उमेदवारी खैरेंना दिली जाईल, असं त्यांना सांगण्यात आलं. त्यामुळंच दानवे नाराज असून त्यातच संभाजीनगर लोकसभा शिंदे गटाला सुटेल अशी शक्यता असल्यानं ते शिंदे गटाकडून लोकसभा लढवतील असं देखील बोललं जातंय.